चित्रपट, टीव्ही मालिकांसाठी काम करणाऱ्यांची दर 15 दिवसांनी RTPCR चाचणी; आयएफटीपीसीचा निर्णय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेकांना काळजीत टाकलं आहे. राज्य सरकारही कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्याच्या मानसिकतेत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मनोरंजनसृष्टीचाही सहानूभूतीपूर्वक विचार केला. त्याची दखल घेऊन आता इंडियन फिल्म एंड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिल अर्थात आयएफटीपीसी यांनी काही महत्वाचे निर्णय़ घेतले आहेत.
कोरोनाचा फैलाव होऊ लागला की त्याला नेहमी टीव्हीवर चालणाऱ्या मालिकांचे सेट बळी पडतात. कारण, टीव्हीच्या सेटवर त्या परिसरातल्या अनेक ठिकाणाहून मंडळी कामासाठी येतात. वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून मंडळी इथे कामासाठी येतात. यात सुप्रसिद्ध कलाकार तर असतातच. शिवाय, यात तंत्रज्ञांचाही समावेश असतो. एका सेटवर साधारण 50 ते 75 लोक काम करत असतात. ही मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कुणाला कुठून होईल हे सांगता येत नसतं. याची दखल घेऊन आयएफटीपीसीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता सध्या चालू असलेल्या सर्व मालिकांच्या सेटवरच्या मंडळींना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. ही टेस्ट दर पंधरा दिवसांनी करण्याचा निर्णय या संघटनेनं घेतला आहे. तर गरज पडली वा सरकारने मागणी केली तर दर आठवड्याला एंटीजेन टेस्ट करण्याची तयारीही कौन्सिलने दर्शवली आहे. हा निर्णय कौन्सिलने सर्व मालिकांच्या निर्मात्यांना कळवला आहे. सर्वच निर्मात्यांनी याला दुजोरा दिला आहे.