Tandav | 'तांडव' वेब सीरिजविरोधात भाजप आमदार राम कदम यांची तक्रार; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
मुंबई: निर्माता अली अब्बास जफर याची 'तांडव' ही वेब सीरिज 15 जानेवारीला प्रदर्शित झाली. आपल्या प्रदर्शनासोबतच ही वेब सीरिज वादात सापडल्याचं पहायला मिळतंय. या वेब सीरिजमधील शंकर आणि राम या हिंदू देवतांवर आधारित एक दृश्य आहे. त्यावरुन सोशल मीडियात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. भाजप नेत्यांनीही या वेब सीरिजवर आक्षेप घेतला आहे.
भाजप नेते राम कदम यांनीही या वेब सीरिजला विरोध दर्शवत निर्माता आणि दिग्दर्शकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "तांडव वेब सीरीज मध्ये झालेल्या हिंदू देव देवतांच्या विटंबनेच्या संदर्भात हिंदूच्या दुखावलेल्या भावनेविरोधात मी या वेब सिरीजचे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता यांच्या विरोधात FRI दाखल करण्यासाठी घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाणे येथे 12. 30 वाजता जाणार आहे."
भाजप नेता कपिल मिश्रा यांनी या वेब सीरिजला विरोध करताना एक ट्वीट केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, "तांडव वेब सीरिज ही दलित विरोधी आहे. ती हिंदूंच्या भावनाही भडकवणारी आहे. या विरोधात माहिती आणि प्रसारण मंत्री जावडेकरांना लोकांनी लिहावं." हे सांगताना कपिल मिश्रा यांनी मंत्रालयाचा ईमेल आयडीही दिला आहे.