Supriya Sule Win Baramati Lok Sabha : अजित पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळेंचा विजय!
बारामती कुणाची? मोठ्या साहेबांची की अजितदादांची? गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून बारामतीकरांनी मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना पसंती दिली आहे तर सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना नाकारलं. राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ही सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे. त्यामुळे बारामतीच्या अतितटीच्या लढाईत काकांनी पुतण्याला धोबीपछाड देत आपणच बारामतीचे 'बॉस' असल्याचा सिद्ध केलं. बारामतीतील पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार याच्यामध्ये चढाओढ सुरू असल्याचं दिसून आलं. पण शेवटच्या टप्प्यात सुप्रिया सुळे यांनी निर्णायक आघाडी घेतली आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे गेल्या 60 वर्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शरद पवारांनी आपल्या लेकीला निवडून आणत बारामती आपलीच आहे हा संदेश दिला.
बारामतीमध्ये अतितटीची लढत
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांचा पहिला सामना झाला तो त्यांच्या होमग्राऊंडवर, बारामतीमध्ये. अजित पवारांनी शरद पवारांशी थेट पंगा घेत, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचीच उमेदवारी जाहीर केली. अजित पवारांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनीही विरोध करत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला.