Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?
Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad koli) यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या ( women Congress workers) आक्रमक झाल्या आहेत. महिला कार्यकर्त्यांकडून शरद कोळी यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यावेळी पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त शरद कोळी यांच्या ऑफिससमोर केला होता. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी बांगड्या आणि चपला दाखवायत शरद कोळींचा निषेध केला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद पेटला आहे. उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते. तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल काँग्रेस महिला आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेस महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात टीका केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शरद कोळी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी या सर्व महिलांना ताब्यात घेतलं आहे.