Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते जाहीर सभा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि लांजा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती झाली नसल्याने तसेच गेले काही दिवस सुरू असलेल्या राणे विरुद्ध राणे या राजकीय संघर्षावर आणि आमदार निलेश राणेंनी केलेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावरील वक्तव्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा आज अखेरचा रविवार आहे. त्यामुळे आज राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात प्रचारसभा आहेत. अक्कलकोट नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची आज सभा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे भाजप एकाकी आहे. शिंदेंची शिवसेनाही वेगळी लढत आहे. त्यामुळे एकाकी भाजपसाठी चंदगडमध्ये मुख्यमंत्री स्वतः आज प्रचार करणार आहेत. त्याचसोबत जयंत पाटलांचा बालेकिल्ला सांगली जिल्ह्यातील ऊरूण ईश्वरपूरमध्येही महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कोकणात आज प्रचार करतील. संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या सिंधुदुर्गातल्या महायुतीतल्या शिमग्याकडे लागलंय. आज मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडीत एकनाथ शिंदेंची प्रचारसभा आहे. त्याआधी दुपारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, लांजा इथेही सभा घेणार आहेत. तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्हा पिंजून काढत आहेत. दौंड, इंदापूर, माळेगाव, बारामतीत त्यांच्या सभा आहेत. भंडाऱ्यात काँग्रेसचे नाना पटोले प्रचार करतील, तर सांगली जिल्ह्यात उरूण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची प्रचारसभा आहे.