पुढील अर्ध्या तासात वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार, SSC बोर्डाच्या अध्यक्षांसोबत बातचीत
Maharashtra SSC Result 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, साडेतीन तास उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आलेला नाही. आता पुढील अर्ध्या तासात हा निकाल पाहात येणार असल्याचा दावा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
दहावीच्या निकाल पाहण्यासाठी दिलेल्या दोन्ही वेबसाईट तब्बल साडेतीन तास उलटूनही अद्याप देखील डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट डाऊन का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, या संदर्भात दावा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी माहिती दिली आहे. मागील वर्षी कोणतीही अडचण आली नव्हती. मात्र, यावेळी काय अडचण आली माहिती नाही. पण, त्यावर काम सुरु असून पुढील अर्ध्या तासात सर्वांना निकाल पाहता येणार आहे. जे सेवा देतात त्यांनाही ही अडचण आली असून त्यांच्या इतर सेवाही विस्कळीत झाल्याचे अध्यक्षांनी सांगितले. सकाळी व्यवस्थित सुरु होतं. याचं टेस्टिंगही चांगलं झालं होतं. मात्र, आज दुपारी एक वाजता अचानक साईटवर वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने साईट क्रॅश झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in , http://result.mh-ssc.ac.in, http://www.mahahsscboard.in या वेबसाईट्सवर पाहता येईल. मात्र या वेबसाईट अडीच वाजेपर्यंत डाऊनच आहेत.
आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाची घोषणा केली. यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.