कर्जबाजारी इंजिनीअर मुलाची घरातच चोरी, उसने पैसे फेडण्यासाठी मित्रांच्या मदतीने स्वत:च्या घरातच चोरी
औरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने औरंगाबादेत मुलानेच आपल्या घरात मित्राच्या मदतीने चोरी केली. चोरलेलं सोनं मन्नपुरम गोल्ड येथे ठेऊन पैसे ही उचलले. हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून चोरीचा बनाव करत पोलिसांत तक्रारही दिली. पोलिसांच्या ताब्यात असलेले हे तीनही तरुण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. दिनेश शिंदे, सुमित प्रसाद आणि कृष्णा लखाणे या तिघांना चोरीच्या गुन्ह्यात पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे दिनेश शिंदेने आपल्याच घरात चोरी करून चोरीचा बनाव केला आहे. दिनेशने आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करण्यासाठी एका टपरी चालकाकडून मित्राच्या मदतीने 60 हजार रुपये उसने घेतले होते. टपरी चालकाने पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने दिनेशने आपल्या मित्रांच्या मदतीने सोनं, चांदी ,रोख रक्कमेसह पावणे दोन लाखांची आपल्याच घरी चोरी केली.