ब्रेकफास्ट न्यूज : इंदिरा गांधी यांचे खासगी सचिव आर के धवन यांचं निधन
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे खासगी सचिव आणि काँग्रेसचे माजी खासदार आर.के.धवन यांचं काल रात्री निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील कपूर रुग्णालयात उपचार सुरु होते. पंतप्रधान कार्यालयात फक्त स्टेनोग्राफर म्हणून आर.के.धवन रुजू झाले होते. मात्र त्यांच्या राजकीय हुशारीनं आणि चौकसपणानं ते अगदी अल्प कालावधीत इंदिरा गांधी यांचे कान आणि नाक बनल्याचं बोललं जातं. आणीबाणी असो की बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय या महत्वाच्या घटनांवेळी आर.के.धवन यांची भूमिका महत्वाची मानली जात होती. इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळी आर.के.धवनही त्यांच्यासोबित होते. बराच काळ अविवाहित राहिलेल्या धवन यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अचलादेवी यांच्याशी विवाह केला होता.