ब्रेकफास्ट न्यूज : आणीबाणीचं काळं युग पाठ्यपुस्तकात आणणार : प्रकाश जावडेकर

आणीबाणीसारख्या काळ्या युगाने लोकशाहीवर काय परिणाम केला, याचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली. भविष्यातील पिढीला याविषयी माहिती व्हावी हा उद्देश असल्याचं ते म्हणाले.

सध्या पाठ्यपुस्तकात पुस्तकांमध्ये आणीबाणीबाबत माहिती, तसेच संदर्भ आहेत, मात्र आणीबाणीसारख्या काळ्या युगाने लोकशाहीवर कशा प्रकारे परिणाम केला याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना आणीबाणीच्या काळ्या युगाबाबत माहिती असण्याची गरज आहे आणि हाच या निर्णयामागचा उद्देश असल्याचं जावडेकर म्हणाले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू केली, जी 21 मार्च 1977 पर्यंत सुरु होती. या काळात अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, तर माध्यमांचा आवाजही दाबण्यात आला.

नागरिकांच्या हक्कांवरही या काळात गदा आणण्यात आली होती. 1975 साली जाहीर करण्यात आलेली आणीबाणी ही देशात तिसऱ्यांदा लावण्यात आलेली आणीबाणी होती. सर्वात पहिल्यांदा 1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी ती लावण्यात आली. तर 1971 मध्ये भारत-पाक युद्धाच्या वेळी ती दुसऱ्यांदा लावण्यात आली. मात्र 1975 साली देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याच्या कारणावरून तिसऱ्यांदा आणीबाणी जाहीर करण्यात आली. अशा कारणावरुन 1975 साली जाहीर करण्यात आलेली पहिली आणि शेवटची आणीबाणी ठरली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola