ब्रेकफास्ट न्यूज | एमपीएससीद्वारे झालेल्या 833 नियुक्या हायकोर्टाकडून रद्द
राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे MPSC मध्ये पास झालेल्या 800 हून अधिक मुलांना सेवेत दाखल होण्यापूर्वीच नारळ मिळाला आहे. राज्य स्पर्धा परीक्षा मंडळामार्फत गेल्यावर्षी घेतलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या निवडी नागपूर खंडपीठाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचं स्वप्न सत्यात उतरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 833 यशस्वी विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. राज्यातील परिवहन विभागात उच्चशिक्षित तरुणांनी यावे, यासाठी राज्य सरकारने 2016 मध्ये जीआर काढून परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल केल्या होत्या. परीक्षेसाठी उमेदवाराला जड वाहनाचे लायसन्स आणि गॅरेजचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारने ती अट शिथील केली. मात्र केंद्राचे नियम राज्याला शिथील करता येत नाहीत, यासह अन्य मुद्यावरुन राजेश फाटे या तरुणाने 27 फेब्रुवारी 2018 रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.