स्पेशल रिपोर्ट : वयाच्या पन्नाशीत 'फादर्स डे'च्या दिवशी बाप होण्याचा जुळून आला योग
संतती प्राप्ती हा आयुष्यातील सर्वाधिक आनंद देणाऱ्या क्षणांपैकी एक क्षण आहे. वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या बापाला एकाच वेळी एक नाही दोन तर तीन मुले जन्मले तर त्या आनंदाचं शब्दात वर्णन करणेही अशक्य आहे. परळीतील कावठाळी येथील शेतकरी हरिभाऊ घुले यांना वयाच्या ४९ वर्षी बाप होण्याचा योग 'फादर्स डे'च्या दिवशी जुळून आला आहे.
जवळपास २५ वर्षांपूर्वी हरिभाऊ यांचा शकुंतला यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर अनेक वर्ष उलटूनही त्यांना संतती प्राप्ती झाली नव्हती. संतती प्राप्तीसाठी त्यांनी अनेक वैद्यकीय प्रयत्न केले. वैद्यकीय प्रयत्नानंतर हरिभाऊ यांनी पहिली पत्नी शकुंतला यांच्या मदतीने गंगाबाई यांच्याशी लग्न केलं. मात्र लग्नाच्या १० वर्षानंतरही गंगाबाई यांना देखील मुल झाले नाही.
गंगाबाई यांच्यावर परळीच्या काळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर डॉक्टरांच्या उपचारांना यश आलं आणि गंगाबाई यांच्या गर्भात तीळे असल्याचे दोन महिन्यांपूर्वी त्यांना समजले. जिगरबाज गंगाबाई यांनी साडेसात महिनन्यानंतर अंबोजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आलं. १५ दिवसांच्या उपचारानंतर तीन मिनिटांच्या फरकाने त्यांनी तीन मुलांना जन्म दिला. तिन्ही बाळांची प्रकृती उत्तम आहे.
गंगाबाई सध्या औरंगपूरला त्यांच्या माहेरी आहेत. गंगाभबाईंच्या तिन्ही मुलांना भेटण्यासाठी लोकही गर्दी करत आहेत. एका बाळाची काळजी घेताना दमछाक होते मात्र गंगाबाई आपल्या तीन बाळांची उत्तर काळजी घेत आहेत.