अंबरनाथ | लोकलमध्ये 'रिर्टन' मारणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक
अंबरनाथ लोकलमध्ये उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांविरोधात मनसेनं आज आंदोलन केलं. अंबरनाथ स्थानकातून सकाळच्या सुमारास सुटणाऱ्या अंबरनाथ-सीएसएमटी लोकल्समध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी स्थानकातून अनेक प्रवासी उलटे बसून येतात आणि जागा अडवून धरतात. यामुळे लोकल अंबरनाथ स्थानकात आल्यानंतर अंबरनाथच्या प्रवाशांना बसायला जागाच मिळत नाही . याबाबत मनसेनं रेल्वे पोलिसांना अशा प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी करत ५ सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. मात्र तरीही ही समस्या कायम असल्यानं सकाळी अखेर मनसेनं अंबरनाथ रेल्वे स्थानकात धडक देत उलटे बसून आलेल्या प्रवाशांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांनी यावेळी अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि मोठा गोंधळ उडाला. यावेळी मनसेच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिलं.