Buldhana Marathi School : राज्यात मराठी शाळेकडे (Marathi School) मराठी भाषिकच पाठ फिरवत असल्याचं वास्तव या वर्षीच्या पटसंख्येवरुन समोर आलं आहे. मराठीच्या तुलनेत उर्दू शाळांची पटसंख्या वाढल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. मात्र मराठीला (Marathi) अभिजात दर्जा मागूनही फारसा फायदा होणार नसल्याचं आता समोर आलं आहे.


राज्यात खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे आता ग्रामीण भागातही आपली मुलं इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा सपाटा सुरु आहे. एकीकडे राज्यकर्ते मराठी-मराठी करत असताना मराठी शाळांकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष होत असल्याने आता मराठी शाळांकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर 2022 यावर्षी प्राथमिक शाळेच्या आकडेवारीनुसार यावर्षी एकूण 7778 एवढी नवीन वाढलेली पटसंख्या असून यात मराठी शाळेतील नवीन विद्यार्थ्यांची संख्या ही 5333 आहे. त्या तुलनेत उर्दू प्राथमिक शाळेतील नवीन पटसंख्या ही 2445 इतकी झाली आहे. हीच संख्या 2021 साली मराठी शाळांमध्ये नवीन प्रवेश 6344 तर उर्दू मध्ये फक्त 1120 होती. हीच परिस्थिती राज्यातील सर्वच जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात आहे.


Case Study
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील मराठी आणि उर्दू शाळेची पटसंख्या ध्यानात घेतली तर एकट्या मेहकरमध्ये मराठी माध्यमात 582 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर उर्दू माध्यमात 944 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मेहकर शहरात नगर परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 06 शाळा असून उर्दू माध्यमाच्या 05 शाळा आहेत.


मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा टक्का घसरला
सध्या राज्यातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा टक्का मोठ्या प्रमाणात घसरला आहे आणि राज्यातील उर्दू शाळेतील टक्क्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील टक्केवारी तर विचारात न घेतलेलीच बरी. कारण अनेक शाळेत पटसंख्या असते 100 पण प्रत्यक्षात शाळेत विद्यार्थी येतात 60. त्यामुळे राजकारण्यांनी कितीही मराठी मराठी केलं तरी मात्र मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. 


उर्दू शाळांना अच्छे दिन
एकीकडे मराठी शाळांच्या पुरती दूरवस्था झाली आहे. तर दुसरीकडे मात्र राज्यातील उर्दू शाळांना अच्छे दिन आलेले आहेत. या शाळांना राज्य सरकारकडून दोन लाख रुपयांचं अनुदान मिळालेले असल्याने या शाळेतील भौतिक सुविधा सुधारल्या आहेत. मात्र मराठी शाळेतील मुलं अजूनही चटईवरच आहेत. शासनाने अल्पसंख्याक शाळेला भरघोस असा निधी दिल्याने त्या शाळांचा दर्जा उंचावला असून या शाळांची विद्यार्थी संख्याही वाढली आहे. मात्र मराठी शाळांना भौतिक सुविधा पुरवण्यात सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे राजकारण्यांनो मराठी मराठी करताना जरा इकडेही लक्ष असू द्या....