Lata Mangeshkwar Passes Away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक प्रसंग घडून गेले आहेत, ज्यामुळे त्यांची कायम आठवण येत राहील. असाच एक प्रसंग घडून गेला आहे, ज्यामुळं लता मंगेशकर यांचं नागपूरसोबत एक खास नातं तयार झालं आहे. 


लता मंगेशकर यांनी साठच्या दशकात नागपुरात घडलेल्या एका कटू प्रसंगानंतर जणू नागपुरात न येण्याची शपथच घेतली होती.  परंतु, नंतर नागपूरकरांनी त्यांची ती नाराजी दूर करत 19 नोव्हेंबर 1996 रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर त्यांचा नागरी सत्कार घेतल्याची आठवण नागपूर महापालिकेच्या तत्कालीन महापौर कुंदाताई विजयकर यांनी सांगितली. 


तेव्हाचा सत्कार सोहळा भव्य दिव्य तर राहिलाच होता. मात्र, त्या सत्कार सोहळ्यात नागपूरचे सर्वपक्षीय नेते आणि विचारवंत आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमात लता दीदींनी गाणं गावं अशी प्रेक्षकांची इच्छा होती. पण सत्कार मूर्तींनाच गाणं गा कसं म्हणायचं? असा प्रश्न  आयोजकांना पडला होता. मात्र, साठच्या दशकात घडलेल्या कटू प्रसंगानंतर नागपूरकरांवर नाराज असलेल्या लता दीदींनी श्रोत्यांसाठी पसायदान गायले होते, अशी आठवण कुंदाताईं यांनी सांगितली.


या नागरी सत्कार सोहळ्यानंतर लता मंगेशकर यांच्याशी विजयकर कुटुंबीयांचे स्नेहबंध नेहमीसाठी जुळले. नंतरच्या काळात जेव्हा जेव्हा लता दीदी नागपुरात यायच्या, तेव्हा त्या विजयकर यांच्याकडे आवर्जून यायच्या. कुंदाताई विजयकरांसोबत फिरायला जाणे, बाजारात जाऊन साड्या खरेदी करणे दीदींना आवडायचे.


नागपुरात साड्या खरेदी करण्याच्या लतादीदींच्या अनेक आठवणी असल्याचे कुंदाताई सांगतात. एकदा नागपुरातील एका हॉटेलमधून घरापर्यंत कुंदाताई यांनी स्वतः कार चालवत लता मंगेशकर यांना घरी आणले होते. कारमध्ये एवढी मोठी व्यक्ती बसल्याने कार चालवताना जीवात जीव नसल्याची आठवण कुंदाताई यांनी यावेळी सांगितली. 


महत्वाच्या बातम्या