नागपूर: केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या दरात वाढ केल्यानंतर गत 15 दिवसांत बहुतांश खाद्यपदार्थांच्या दरात 15 टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. पॅकबंद वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावल्यानंतर पीठ, तांदूळ, रवा, मैदा, सोजी, डाळ (तूर) आणि राजमासह अन्य खाद्यपदार्थांचे दर वधारले आहे. नॉनब्रँडेड पिठाच्या किमतीतही 15-20 टक्के तर दही, ताकाच्या दरातही 7 टक्के वाढ झाली आहे. दुकानदार आता वाढीव दरानुसार ग्राहकांना वस्तू विकत आहे. पूर्वी 5 किलो पीठ (आटा) 170 रुपयात मिळत होते, ते आता 185-190 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर 60 रुपये प्रतिकिलो मिळणारा तांदूळ आता 65 रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
डाळींमध्ये 8-10 रुपयांची तेजी
डाळींच्या किमतीत 8-10 रुपये प्रतिकिलोने वाढ आली आहे. खाद्यपदार्थांवर जीएसटी लागल्याने घरगुती बजेट पूर्णत: बिघडले आहे. लोक आधीच डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलिंडरच्या दराने त्रस्त आहे, त्यातच आता पॅकबंद वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावल्याने समस्येत भर पडली आहे. आता सर्वच ठिकाणी तांदूळ, पीठ, डाळ, सोजी आदींचे दर वाढले आहे. काही ठोक दुकानांमध्ये तर पूर्वीपासूनच ठेवण्यात आलेले खाद्यपदार्थांचे पॅकेट 5 टक्के जीएसटी जोडून ग्राहकांना विकल्या जात आहे.
दुकानदार, ग्राहक अजूनही संभ्रमात
व्यापारी अनिल नागपाल म्हणाले, दरवाढीचे संकट तर आहेच, शिवाय संभ्रमावस्थाही वाढली आहे. कोणत्या वस्तूवर जीएसटी लावायचा आणि कोणत्या वस्तूवर नाही, हे समजणे आणि ग्राहकांना समजावणे कठीण झाले आहे. खुली तूर डाळ घेतल्यास जीएसटी नाही आणि पॅकेट घेतल्यास जीएसटी, अशी स्थिती आहे. जीएसटी लागताच 5-7 रुपयाने वस्तू महाग होत आहे.
सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना झटका
नागपाल म्हणाले, सुपर मार्केटमध्ये जवळपास सर्वच वस्तू पॅकबंद असल्याने ग्राहकांना जोरदार फटका बसत आहे. तांदूळ, डाळ, रवा, मैदा आदी सर्वच वस्तू ते पॅकबंद विकतात. त्यामुळे सर्वच वस्तू सुपर मार्केटमध्ये 5-10 रुपये अधिक किमतीत विकल्या जात आहे.
साबणांच्या किमती 50 टक्क्यापर्यंत वाढल्या
साबणांच्या किमतीत किमान 50 टक्के वाढ झाली आहे. लक्स 5 साबणांचा पॅक पूर्वी 100 रुपयात येत होता, तो आता 160 रुपयांवर पोहोचला आहे. कपडे आणि भांडी धुण्याच्या साबणांच्या किमतीत फारशी तेजी नाही. परंतु 10 ते 15 टक्के दर वाढले आहे. कपडे धुण्याच्या पावडरच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. पूर्वी 50 रुपयात मिळणारे पावडर आता 65 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आता लोकांना जवळपास सर्वच वस्तूंसाठी अधिकची किंमत मोजावी लागत आहे. एका कुटुंबाचे महिन्याचे बजेट कमीत कमी 800-1000 रुपयांनी वाढले आहे.