Zero Hour Full : दोन ठाकरे, एक मोर्चा? मराठीसाठी एकत्र येणार? ABP Majha
झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. महाराष्ट्रात कधी नव्हे इतका तिसरी भाषासक्ती ज्यालाच अप्रत्यक्ष हिंदी सक्ती म्हटली जातेय, तो मुद्दा पेटलाय. सरकारने हा निर्णय अजून तरी पूर्णपणे मागे घेतला नसला तरी आम्ही हिंदी सक्ती नव्हे तर तिसऱ्या भाषेला अनेक पर्याय दिलेत, अशी सारवासारवीची भाषा सुरू ठेवलीये. मात्र, यावरुन महाराष्ट्रातील कुणाही साहित्यिक, कलाकार, विचारवंत व्यक्ती यांचं समाधान झालेलं दिसलेलं नाही. ना तशी कुणाची समर्थनातली बाजू पुढे आलीये. सरकारविरोधी पक्ष तर विरोधात आहेतच, आणि आता तर अजित दादाही ५वीपासून हिंदी-संस्कृत आहेच ना? असा सवाल करतायत. दुसरीकडे, दीपक पवारांसारखे मराठी भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते यावरुन जन आंदोलन उभारतायत.
मात्र, हे वातावरण अधिकच गरम केलंय ते दोन्ही ठाकरे बंधुंनी. कारण, आज एकीकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषावादी समन्वय समितीची भेट घेतली. त्यानंतर उद्धव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यात भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप केला. राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीविरोधात येत्या ७ जुलैला मराठी भाषावादी संघटनांच्या निघणाऱ्या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबाही त्यांनी जाहीर केला. तिकडे राज ठाकरेंची भेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतली. मात्र, राज यांच्या मुद्द्यांना समाधानकारक स्पष्टीकरण त्यांना देता न आल्यानं, ही भेट निष्फळ ठरली. यानंतर, राज ठाकरेंनीही पत्रकार परिषद घेतली. हिंदीला विरोध दर्शवत मनसेकडून ६ जुलैला राजकीय पक्षाच्या झेंड्याचा नव्हे तर अजेंड्याचा मोर्चा जाहीर केला. मात्र, थोड्याच वेळात ६ तारखेला आषाढी असल्यानं त्यांनी मोर्चाची तारीख ५ जुलै केल्याचे जाहीर केलं. हा अराजकीय मोर्चा असेल, यात सर्व मराठी प्रेमींनी सहभागी व्हावं, असं आवाहन राज यांनी केलं. या मोर्चात कोणकोण सहभागी होतंय, कोण होत नाही, हे मी पाहणार आहे, असंही राज म्हणाले. दरम्यान, दोन वेगवेगळे मोर्चे न निघता एकच मोर्चा निघावा यासाठी मनसेकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचंही समोर येतंय. या पार्श्वभूमीवर आपण पाहुयात उद्धव आणि राज यांच्या प्रतिक्रिया आणि त्यानंतर वळूयात आजच्या प्रश्नाकडे.....