Zero Hour Full : भाजप-शिवसेनेमध्ये नाराजीनाट्य, यापुढे फोडाफोडी न करण्याचा 'करार'?; विरोधकांचा वार
Zero Hour Full : भाजप-शिवसेनेमध्ये नाराजीनाट्य, यापुढे फोडाफोडी न करण्याचा 'करार'?; विरोधकांचा वार
राज्याच्या राजकारणात सध्याचं वाहणारं एकमेव वारं... निवडणूक .... निवडणूक ... आणि निवडणूक ... निवडणूक म्हटली कि ओघाने नाराजी, बंडखोरी वगरे आलीच ..पण आज त्यामुळे महायुतीत जे नाराजीनाट्य रंगलं . त्याचे थेट परिणाम राज्याच्या कॅबिनेट बैठकीत दिसले. त्यामुळे काही कधी न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडल्या... उदाहरणादाखल, कधीही न चिडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मंत्र्यांवर संतापले..तेही आपल्या मंत्र्यांवर नाही तर मित्र पक्षाच्या मंत्र्यावर. काही मंत्री मंत्रालयात असूनही कॅबिनेट बैठकीला गेले नाहीत. एवढंच नाही तर इतर वेळी आमच्या पक्षात अमुक येणार तमुक येणार हे जोराने सांगितलं जात असताना आज मात्र काही पक्षप्रवेश शेवटपर्यंत गुप्तता राखत केले गेले. अशा बऱ्याच घडामोडी आहेत. मुख्यमंत्री कोणावर चिडले, कोण कॅबिनेटच्या गेलं नाही, कोणी कोणाचा प्रवेश घेतला. गुप्तता काय आणि कशी होती, हे सगळं आपण आजच्या झीरो अवरमध्ये बघणार आहोत...
आजच्या नाट्यमय घडामोडींची सुरुवात झाली ती सकाळी सकाळी. भाजपात कोणीतरी महत्वाचं प्रवेश करणार असं कळत होतं. पण कोण, कुठे, किती वाजता, कुठला पक्ष सोडून येतंय ह्याबाबत मात्र भाजपने कमालीची गुप्तता पाळली. त्याला कारणही तसंच होतं. शिंदेंच्या बालेकिल्ल्याला भाजपनं लावलेला सुरूंग.
कल्याण-डोंबिवलीतल्या शिंदे गटाच्या अनेक माजी नगसेवकांनी आज हाती कमळ घेतलं. त्यातही स्थायी समितीचे दिवंगत अध्यक्ष वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रेंना भाजपनं प्रवेश देणं शिवसेनेच्या जिव्हारी लागलंय. ते खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्ती मानले जायचे. अगदी अलीकडे दीपेश म्हात्रे भाजपकडे गेल्याची जखम ओली असतानाच हा घाव तर वर्मी बसणार होता ... अगदी पक्षप्रमुखाच्या मुलाचा सच्चा कार्यकर्ता मानला जाणारा नेता फोडल्यानं शिंदेसेनेच्या नाराजीचा उद्रेक झाला. मात्र तिथे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण ह्यांनी शिवसेनेत नाराजी नसल्याचा दावा केला ...