MNS - Shivsena Zero Hour : मनसेला मविआमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय?
abp majha web team | 13 Oct 2025 08:46 PM (IST)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 'काँग्रेसला (Congress) सोबत घेणं गरजेचं आहे ही राज ठाकरेंचीच (Raj Thackeray) इच्छा आहे,' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं, ज्यामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली. मात्र, राऊतांच्या या दाव्यानंतर मनसे (MNS) आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे ठरवतात असं सुनावलं, तर काँग्रेसनेही अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. या सर्व गदारोळानंतर राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेज पाठवून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे. दरम्यान, राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे, ठाण्यातील मोर्चात ठाकरे सेना आणि मनसे एकत्र आल्याने दोन्ही भावांच्या पक्षांतील जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे.