Special Report Ghatkopar Marathi Issue : आहार मराठींचा, माज गुजरातींचा? मांसाहारावरुन वादाला ठिणगी
Special Report Ghatkopar Marathi Issue : आहार मराठींचा, माज गुजरातींचा? मांसाहारावरुन वादाला ठिणगी
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात गुजराती लोकांकडून मराठी कुटुंबाचा अपमान केल्याची आणि त्यांना शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या (Ghatkoper News) या सोसायटीत बहुतांश जण हे गुजराती (Gujrati), मारवाडी समाजातील आहेत. या सोसायटीत फक्त चार कुटुंब मराठी आहेत. त्यामुळे या मराठी कुटुंबांनी (Marathi Family) सोसायटीमधील घर विकावे आणि दुसरीकडे जावे, यासाठी काही गुजराती व्यक्तींकडून मराठी कुटुंबीयांचा छळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरत संबंधित गुजराती आणि जैन कुटुंबीयांना या सगळ्याचा जाब विचारला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. आता याप्रकरणातील आणखी माहिती समोर आली आहे. (Marathi Vs Gujrati)
घाटकोपरच्या श्री संभव सोसायटीमध्ये दोन दिवसांपूर्वी येथील मराठी रहिवासी राम रिंगे यांच्यासोबत सोसायटी कमिटीचा वाद झाला होता. या सोसायटीमध्ये एकूण 42 कुटुंब आहेत. ज्यामध्ये चार मराठी कुटुंब आहेत, तर एक उत्तर भारतीय आणि एक मारवाडी कुटुंब आहे. गेल्यावर्षी या सोसायटीची निवडणूक झाली होती. राम रिंगे या निवडणुकीला उभे राहिले होते. या निवडणुकीत राम रिंगे यांचा पराभव झाला होता. तेव्हा शहा नावाचा गुजराती व्यक्ती म्हणाला की, तुमची लायकी नाही, निवडणुकीला कशाला उभे राहता? तुम्ही मटण-मच्छी खाता, कुत्रा पाळता, तुम्ही घाणेरडे लोक आहात. यावर राम रिंगे यांनी म्हटले की, आम्ही घाणेरडे असू तर तुम्ही महाराष्ट्रात कशाला राहताय? यानंतर सोसायटीमधील गुजराती पदाधिकाऱ्यांनी आणि इतर लोकांनी राम रिंगे आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली. सोसायटीमधील इतर लोकांनी वेगळा ग्रूप तयार केला आहे. आम्हाला बिल्डिंगमधील कोणत्याही कार्यक्रमात सहभाग करुन घेतले जात नाही. आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांपूर्वी वाद झाला तेव्हा शाह नावाच्या व्यक्तीने आम्हाला शिवीगाळ केली, असे राम रिंगे यांनी सांगितले. मात्र, मनसेचे कार्यकर्ते सोसायटीमध्ये शिरल्यानंतर आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेल्यावर शाह नावाच्या व्यक्तीने समोर येण्याची हिंमत दाखवलेली नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून येणारे फोनही उचलायला तो तयार नाही, असे मनसेच्या राज पार्टे यांनी सांगितले.