Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच धुमाकूळ घातला. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नागपूरच्या पाथरी भागात बिबट्या घुसला... आणि त्यामुळे नागरिकांची आणि वनविभागाचीही चांगलीच पळापळ झाली. बिबट्याला जेरबंद करायला तीन तास लागले... मात्र त्यानंतर त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये नेताना वनविभागाची हलाखीची परिस्थिती दिसून आली... हा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही मांडण्यात आला...
बिबट्याला जेरबंद केलं. मात्र या बिबट्यामुळे आपल्या इकडच्या भंगार यंत्रणेची पोलखोल झालीय.. त्याचं झालं असं... बिबट्याला ट्रीटमेंट सेंटरकडे नेणारी खटारा गाडी अवघ्या काही अंतरावर बंद पडली... त्यामुळे दुसऱ्या एका ट्रकमध्ये बिबट्याचा पिंजरा हलवून पुढचा प्रवास करावा लागला. तर बंद पडलेली गाडीही धक्का मारून न्यावी लागली...
बिबट्या जेरबंद करताना कर्मचाऱ्यांकडची साधनसामग्रीची स्थितीही धक्कादायक होती. सुरक्षेसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे स्वतःच्या शिल्ड नव्हत्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांकडच्या शिल्ड वापराव्या लागल्या.. या सगळ्या प्रकारानंतर एबीपी माझाने याच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं देशातलं पहिलं ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्याचा बहुमान नागपूरला मिळाला खरा. पण आज या केंद्राची दुरवस्था झालीय. केंद्राच्या पार्किंगमध्ये तीन तीन रेस्क्यू व्हॅन दिसतात, पण या तिन्ही व्हॅनना गॅरेजमध्ये पाठवण्याची गरज दिसतेय ..एकीकडे राज्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. तर दुसरीकडे बिबट्याला पकडण्यासाठी धाव घेणारे वनकर्मचारी अपुऱ्या साधन सामग्रीनिशी जिवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडताहेत. बिबट्यांचा वाढता उपद्रव पाहता वनमंत्र्यांनी आता नेहमीचे दरबार, महायुतीतलं शहकाटशहाच्या राजकारणाबरोबर थोडं स्वतःच्याच विभागातल्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.