Raigad Flood : रायगड जिल्ह्याला पावसाचा तडाखा, शहरं, गावं, महामार्ग सर्वत्र पूर, दरडही कोसळली
एबीपी माझा वेब टीम | 22 Jul 2021 10:31 PM (IST)
राज्यात पावसाने रौद्ररुप धारण केले असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुढील 3 तास सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात माथेरान, खंडाळा, महाबळेश्वर तसेच रत्नागिरी, अलिबाग परिसरात अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातही अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तिकडे विदर्भात देखील नागपुरातील काटोल, रामटेक आणि उमरेडमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. वर्ध्यातील हिंगणघाट, ब्रह्मपुरी, पुसद, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.