Special Report: सराफ व्यापाऱ्यांना अतिविशेष क्रमांकाची सक्ती,केंद्राच्या निर्णयांमुळे व्यापारी नाराज
सरीता कौशिक, एबीपी माझा | 04 Aug 2021 11:29 AM (IST)
सरकारने एकीकडे दागिन्यांना हॉलमार्क असावा हे अनिवार्य केले आहेच, मात्र आता त्याचबरोबर प्रत्येक दागिन्याला देशात एक अतिविशेष क्रमांक देण्याची प्रक्रिया सुद्धा अनिवार्य केली आहे. ह्या अतिविशेष क्रमांकाला एचयूआयडी प्रणाली म्हणजेच हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असे म्हटले आहे. मात्र त्यावरूनच आता देशातील सराफा व्यापारी विरुद्ध केंद्र सरकार असा नवा संघर्ष बघायला मिळतो आहे. त्यातच आजपासून सराफा व्यापाऱ्यांना ऑगस्ट 15 पर्यंत सरकारच्या नव्या नियमांचे पालन करण्याच्या नोटिसेस बजावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ११००० सराफा व्यावसायिकांना त्या मिळाल्याचे कळते आहे.
दागिने हॉलमार्क करणे हे अनिवार्य नसले तरी हि देशातील बरेच सराफा व्यापारी हे आपल्या मालाचे हालमार्किंग गेली २० वर्ष करवून घेत आहेतच. मात्र अजून हि देशात फक्त ९३३ हॉलमार्क करणाऱ्या लॅब्स किंवा केंद्र उभे राहू शकले आहेत ज्यातील ४५० केंद्र हे वेगवेगळ्या कारणाने सरकारनेच स्थगित केले आहेत. त्यातच पर्याप्त मात्रेत लॅब्स नसताना एचयूआयडीचा निर्णय घेतल्यामुळे दागिन्यांची पूर्ण आवक, जावक आणि विक्री ह्यावरच परिणाम होऊन उद्योगच ठप्प होऊन जातील असे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हि प्रक्रिया फक्त एक अतिविशेष क्रमांक देऊन संपणार नसून, हा प्रत्येक क्रमांक भारतीय मानक ब्युरोच्या पोर्टल अपलोड करणे तसेच आता असणारा व्यापाऱ्यांच्या सर्व दागिन्यांच्या साठ्याला हि हा क्रमांक देणे आता अनिवार्य केले आहे. आता हे सर्व फक्त ४००-४५० केंद्रांच्या भरवश्यावर कसे करायचेच हा प्रश्न सराफ व्यावसायिकाच्यासमोर आहे