Majha Katta : 'माझा'च्या 14 वर्षांचा चमकदार फ्लॅशबॅक ; मुख्य संपादक राजीव खांडेकर माझा कट्ट्यावर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : 'माझा'च्या कट्ट्यावर आलेल्या अनेक नामवंत पाहुण्यांना बोलतं करणारे एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आजच्या कट्ट्याचे प्रमुख पाहुणे होते. त्यांची मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली. 'माझा'च्या 14 वर्षांचा चमकदार फ्लॅशबॅक या कट्ट्याच्या माध्यमातून समोर आला. 'माझा'च्या बातमीत लोकांना विश्वासार्हता वाटते, हेच यश असल्याची भावना यावेळी मुख्य संपादक राजीव खांडेकरांनी व्यक्त केली.
कोणतंही माध्यम हे त्याच्या संपादकासोबत मोठं होत असतं आणि संपादक जर स्थिर असेल तर ते माध्यम आणि संपादक एकच चेहरा बनतो. तसा राजीव खांडेकर हा ब्रॅन्ड बनल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.
आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना राजीव खांडेकर म्हणाले की, "सांगलीतील आटपाडी या मूळ गावानं मला घडवलं. आणिबाणी काळात शाळेत असताना आजूबाजूच्या राजकीय घडामोडींनी उत्सुकता वाढवली आणि त्याला वर्तमानपत्रांनी खतपाणी घातलं. त्याच वयात कुठेतरी पत्रकारितेमध्ये करियर करावं असं ठरवलं."
पत्रकारितेत येताना डोळ्यासमोर कोण आदर्श होते असा प्रश्न विचारला असता राजीव खांडेकर म्हणाले की, "त्यावेळी माझ्यासमोर महाराष्ट्र टाईम्सचे संपादक गोविंदराव तळवळकर आणि गवा बेहेरे हे दोन आदर्श होते. तळवळकरांचे अग्रलेख मी रोज वाचायचो. या दोघांच्याही लेखणीतील तिखटपणा हा समान धागा होता. तळवळकरांचे लेखन शेवटपर्यंत वाचलं."
पहिली बायलाईन आली त्यावेळी काय भावना होती असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावेळी राजीव खांडेकर म्हणाले की, "माझी पहिली बायलाईन बातमी ही दलित मुलांच्या त्याच्या शिष्यवृत्तीसंबंधी होती. त्यावेळी समाजकल्याण खात्यात मोठा भ्रष्टाचार झालेला होता. त्या पहिल्या बायलाईचा मोठा आनंद झाला होता."
प्रत्येक घटना काहीतरी शिकवते. काही जणांनी कसं वागायचे तर काही जणांनी कसं वागायचं नाही असं ठरवलं असं राजीव खांडेकरांनी सांगितलं.
ई-टीव्हीत काम केल्यानंतर पुन्हा लोकसत्तामध्ये काम केलं. तिथं वेगवेगळे प्रयोग केले. त्यानंतर लोकसत्ता सोडून त्यावेळचे 'स्टार माझा' या ठिकाणी संपादक म्हणून जबाबदारी घेतली असं आपल्या पत्रकारीतेतील वाटचालीबद्दल सांगताना राजीव खांडेकर म्हणाले.