Sri Lanka Accepts UPI : UPI द्वारे पेमेंट करणं हे भारतात किती लोकप्रिय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. भारतीय लोकांना सहज प्रवास करता यावा यासाठी भारत सरकार आता इतर देशांमध्येही UPI सेवा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. नुकतेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) फ्रान्सच्या (France) दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी फ्रान्समध्ये UPI पेमेंट चालवण्याबाबत भाष्य कले. फ्रान्सनंतर आता दुसऱ्या देशात UPI पेमेंट सेवा सुरू होणार आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी या संदर्भात करार केला आहे.


सिंगापूर, UAE, नेपाळ, भूतान आणि फ्रान्स नंतर आता श्रीलंका देखील भारताची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट सेवा स्वीकारणारा आणखी देश आहे. याचाच अर्थ, जर तुम्ही श्रीलंकेला गेलात, तर आता तुम्ही तेथे UPI द्वारे पेमेंट करू शकणार आहात.


भारताची मोबाईल आधारित पेमेंट प्रणाली, UPI ग्राहकांना दिवसाच्या कोणत्याही वेळी त्वरित पेमेंट करण्याची परवानगी देते. यासाठी व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस म्हणजेच व्हीपीए वापरला जातो. UPI व्यतिरिक्त, भारत आणि श्रीलंका यांच्यात पेट्रोलियम लाईन आणि लँड ब्रिज कनेक्टिव्हिटीबाबतही चर्चा झाली आहे. 2022 मध्ये भारताने श्रीलंकेला कर्जासह 4 अब्ज डॉलर्सची मदत केली होती. आर्थिक संकटाशी लढण्यासाठी भारत सरकारने शेजारील देशाला अन्न आणि इंधन खरेदीसाठी मदत केली होती.


फ्रान्समधील 'या' ठिकाणाहून UPI ​​सेवा सुरू होणार आहे 


संपूर्ण फ्रान्समध्ये UPI सेवा अद्याप सुरू झालेली नाही. यूपीआय पेमेंट आयफेल टॉवरपासून सुरू होईल आणि लोक रुपे कार्डवरून तिकीट खरेदी करू शकतील. फ्रान्सच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की युरोपियन देशातही UPI पेमेंट स्वीकारले जाईल. याशिवाय सिंगापूरनेही UPI पेमेंटचा स्वीकार केला आहे. भारताच्या UPI आणि सिंगापूरच्या PayNow ने एका करारावर स्वाक्षरी केली आहे ज्यामुळे लोकांना रिअल-टाईम, देशाबाहेरही सुरक्षित पेमेंट करता येईल. 


UPI वेगाने वाढत आहे


डिजिटल पेमेंटसाठी UPI पेमेंट प्रणाली भारतात खूप लोकप्रिय झाली आहे आणि जगभरात वेगाने वाढत आहे. आतापर्यंत फ्रान्स, UAE आणि सिंगापूरने UPI संदर्भात भारताबरोबर भागीदारी केली आहे. UPI ही भारताची मोबाइल-आधारित जलद पेमेंट प्रणाली आहे, जी लोकांना व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) वापरून 24 तासांत कधीही, कुठेही झटपट पेमेंट करू देते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Twitter New Feature : LinkedIn प्रमाणे आता ट्विटरद्वारेही नोकरीची संधी, लवकरच येणार नवीन फिचर