Twitter take LinkedIn Job Feature : मायक्रोब्लॉगिंग ट्विटर (Twitter) च्या युजर्समध्ये घट झाली आहे. मेटा (Meta) कंपनीच्या नव्या थ्रेड्स ॲपचा (Threads) हा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे युजर्सना आकर्षित करण्यासाठी सीईओ एलॉन मस्क ट्विटरमध्ये अनेक बदल करत आहेत. कंपनी ट्विटरवर एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. हे फिचर नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. ट्विटर लवकरच व्हेरिफाईड कंपन्या आणि संस्थांसाठी नवीन फीचरवर काम करत आहे. या फिचरचा सामान्य युजर्सला देखील लाभ मिळू शकतो. एलॉन मस्क यांनी या वर्षी मे महिन्यात या खास फिचरचे संकेत दिले होते. ट्विटर कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामध्ये कंपन्या किंवा संस्थांकडून नोकऱ्यांची माहिती दिली जाईल.


लिंक्डइनप्रमाणे आता ट्विटरद्वारेही नोकरीची संधी


ट्विटरच्या नवीन फीचरमुळे व्हेरिफाईड संस्थांना त्यांच्या बायोमध्ये जॉब लिस्ट पोस्ट शेअर करता येतील. यामुळे लोक नोकरीच्या शोधात आहेत ते कंपनी किंवा संस्थेच्या बायमधील लिंकद्वारे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोकरीसाठी थेट अर्ज करू शकतात. म्हणजेच ट्विटर एक प्रकारे लिंक्डइनप्रमाणे काम करेल. कंपनीने अद्याप अधिकृतपणे जॉब पोस्टिंग फिचरची घोषणा केलेली नाही, पण काही व्हेरिफाईड संस्थांनी हे फिचर वापरण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांच्या बायोमध्ये त्या अंतर्गत नोकर्‍यांची माहिती पोस्ट केली आहे.




लवकरच येणार ट्विटरचं नवीन फिचर


सीईओ एलॉन मस्क यांच्या हाती ट्विटर कंपनी आल्यापासून त्यांनी सतत नवनवीन बदल करण्यात आले आहेत. आता ट्विटर जॉबशी संबंधित फीचरवर काम करत आहे. प्रोफेशनल सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइन (LinkedIn) शी स्पर्धा करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. यासोबतच ट्विटरने अधिकृत @TwitterHiring नावाने अकाऊंट देखील तयार केले आहे, पण या ट्विटर अकाऊंटवरून अद्याप कोणतीही माहिती ट्वीट करण्यात आलेली नाही.


मस्क यांनी घेतला थ्रेड्सचा धसका


मेटा कंपनीने 5 जुलै रोजी थ्रेड्स ॲप लाँच केलं. या ॲपने अवघ्या काही दिवसांतच ट्विटरच्या युजर्सना भुरळ पाडली. यामुळे ट्विटरच्या युजर्समध्ये घट झाली आहे. एलॉन मस्क यांनी याचा धसका घेतला असून युजर्स ट्विटर सोडू नयेत यासाठी आता ट्विटरवर अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटर कंपनीने माहिती शेअर करत सांगितलं होतं की, ट्विटर जाहिरातींच्या कमाईचा काही भाग निर्मात्यांना शेअर करेल. अलीकडे, मस्कने ट्विट वाचण्याची मर्यादा आणि कमाई धोरण बदलले आहे जेणेकरून वापरकर्त्यांना अधिक फायदा मिळू शकेल.