Robot Attack on Tesla Worker : बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये तुम्ही रोबो (Robo) पाहिले असतील. बॉलिवूडचा 'रोबोट' (Robot) चित्रपट (Movie) आणि त्याचा सिक्वेल चित्रपटही खूप गाजला होता. या चित्रपटात दाखवलं होतं की, माणूस आधुनिक तंत्रज्ञानाचा (Tecnology) वापर करत रोबोटची निर्मिती करतो. पण, त्यानंतर हा मानवनिर्मित रोबोटचं मानवावर वरचढ ठरतो. मानवनिर्मित रोबोट माणसांवर हल्ला (Robot Attack on Human) करतो आणि त्यानंतर काही शूर धाडसी माणसं त्याला सामोरं जातात आणि हरवतात. हे सर्व चित्रपटात पाहणं फार मनोरंजक असतं. पण, असं खरोखर घडलं तर. या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणेच काहीसं खऱ्या आयुष्यात घडलं आहे. एका रोबोटने मानवावरच हल्ला केला आणि त्याला अक्षरक्ष: रक्तबंबाळ केलं.


टेस्लाच्या रोबोटचा माणसावर जीवघेणा हल्ला


जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार (Electric Car) निर्माती कंपनी टेस्ला (Tesla) संदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, टेस्ला कंपनीच्या टेक्सासमधील गिगा कारखान्यात (Tesla Giga Texas Factory) एका रोबोटने कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. टेस्लाच्या रोबोने कर्मचाऱ्यावर हल्ला केला, त्याला जमिनीवर आपटून मारलं आणि रक्तबंबाळ केलं. टेस्ला कंपनीने ही घटना दोन वर्ष लपून ठेवल्याचं सांगितलं जात आहे.


रोबोटनं कर्मचाऱ्याला जमिनीवर आपटलं


ही घटना 2021 मधील असल्याचं सांगितलं जात आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, टेस्ला कंपनीमधील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरसोबत ही दुर्घटना घडली. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली असून त्यासंदर्भात माहिती आता समोर आली आहे. टेस्लाच्या ऑस्टिन येथील फॅक्टरीमध्ये हा इंजिनीअर काम करत होता. यावेळी एका तांत्रिक बिघाड असलेल्या रोबोटने या इंजिनिअरवर हल्ला केला. या घटनेमुळे खळबळ माजली उपस्थितांपैकी दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने आपात्कालीन बटण दाबून इंजिनीअर कर्मचाऱ्याचा जीव वाचवला.


रोबोची व्यक्तीला कडकडून मिठी


या दुर्घटनेवेळी उपस्थितांनी सांगितलं की, हा इंजिनीअर रोबोट नियंत्रण करणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामवर काम करत होता. त्यावर काम करता यावे म्हणून त्यांनी दोन अॅल्युमिनियम कटिंग रोबो अकार्यक्षम केले होते. पण चुकून तिसरा रोबो अकार्यक्षम होऊ शकला नाही. या तिसऱ्या रोबोटने इंजिनीअवरच हल्ला करून त्याला जमिनीवर फेकलं. यानंतर त्याचे हात आणि पाठ घट्ट पकडली. यामुळे कर्मचाऱ्याला मार लागला आणि रक्तस्त्राव सुरू झाला. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने इमर्जन्सी स्टॉपचे बटण दाबले. त्यानंतरच इंजिनीअर कर्मचारी स्वत:ला रोबोटच्या पकडीतून सोडवू शकला.


रोबोटच्या हल्ल्यात कर्मचारी रक्तबंबाळ 


टेस्लाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, रोबोटच्या तावडीतून सुटल्यानंतर इंजिनीअर बाहेर धावला, तेव्हा रक्तबंबाळ अवस्थेत होता. या घटनेची माहिती ट्रॅव्हिस काउंटीचे अधिकारी आणि आरोग्य संस्थांना देण्यात आली. याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, इंजिनीअरच्या अंगावर जखमा होत्या.