Jio Bharat V2: रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी जिओने 'जिओ भारत V2' लॉन्च केला आहे. जिओ भारत V2 (Jio Bharat Phone) हा फोन अतिशय स्वस्त दरात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे, कारण त्याची किंमत फक्त 999 रुपये ठेवण्यात आली आहे. रिलायन्स कंपनीचा (Reliance Company) दावा आहे की, 'जिओ भारत V2'च्या आधारे कंपनीशी 10 कोटींहून अधिक ग्राहक जोडले जातील.


जिओ कंपनीने भारतातल्या 25 कोटी 2G वापरकर्त्या ग्राहकांना लक्ष्य करत हा नवीन फोन लॉन्च केला आहे. एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांशी जोडलेल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने स्वस्त दरात हा फोन आणला आहे, याचा रिचार्ज देखील अवघ्या 123 रुपयांत उपलब्ध होणार आहे. बाजारातील इतर ग्राहक इतक्या कमी किमतीत कोणताही प्लॅन उपलब्ध करुन देत नाहीत, त्यामुळे या स्किमचा रिलायन्सला फायदा होऊ शकतो.


रिलायन्सच्या 'Jio Bharat V2' ची किंमत बाजारात उपलब्ध असलेल्या इतर इंटरनेट फोनपेक्षा सर्वात कमी आहे. 999 रुपयांमध्ये मिळत असलेल्या फोनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 123 रुपये द्यावे लागणार आहेत. रिलायन्स जिओ कंपनीने दावा केला आहे की, जिओ भारत V2 च्या आधारे 10 कोटींहून अधिक ग्राहक लवकरच 2G वरून 4G वर स्विच करतील.


जिओ भारत V2 ची वैशिष्ट्यं


जिओचा हा मोबाईल भारतात बनवलेला आहे, जो फक्त 71 ग्रॅम वजनाचा आहे. 'Jio Bharat V2' हा फोन 4G इंटरनेट सेवेवर काम करतो. यात FM रेडिओ, HD व्हॉईस कॉलिंग, 128 GB SD मेमरी कार्ड सपोर्ट सारखी वैशिष्ट्यं आहेत. मोबाईलमध्ये 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा, 1.77 इंच TFT स्क्रीन, 1000 mAh बॅटरी, 3.5 mm हेडफोन जॅक, शक्तिशाली लाऊडस्पीकर आणि टॉर्च उपलब्ध आहे. जिओ भारत V2 मोबाईल ग्राहकांना जिओ सिनेमाच्या सबस्क्रिप्शनसह जिओ सावनमधील 80 दशलक्ष गाण्यांची सुविधा देखील देणार आहे. या फोनद्वारे तुम्ही यूपीआय व्यवहार देखील करू शकता. जिओ पे द्वारे यूपीआय व्यवहार करता येणार आहेत. जिओचा हा मोबाईल 22 भारतीय भाषांमध्ये काम करू शकतो.


जिओचा 999 रुपयांचा हा फोन 123 रुपयांच्या मासिक प्लॅनसह उपलब्ध होणार आहे. या प्लॅनमध्ये जिओ भारत V2 आपल्या ग्राहकांना 14 जीबी 4G डेटा देणार आहे. एखाद्या ग्राहकाला संपूर्ण एका वर्षासाठी रिचार्ज करायचं असल्यास त्यांना फक्त 1,234 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने 7 जुलैपासून जिओ भारत V2 ची बीटा चाचणी सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. 


हेही वाचा: