Pay with FASTag : संपूर्ण देशभरात चारचाकी गाड्यांसाठी फास्टॅग (FASTag) वापरणं बंधनकारक आहे. पण तुम्ही फास्टॅग (FASTag) वापर नक्की कशाकशासाठी करता? फक्त टोल नाक्यावर टोल भरण्यासाठीच? पण तुम्हाला जर आम्ही सांगितलं की, आता फास्टॅगचा वापर कार पार्किंगचे चार्जेस भरण्यासाठीही करता येणार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल? नाही ना. पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. कारण आता कार पार्किंगचे पैसे (Parking Charges) फास्टॅगमधून भरणं शक्य होणार आहे. आता तुम्ही कुठेही गेलात, शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल किंवा इतर कुठेही, तर तुम्हाला पार्किंग चार्जेस रोख रकमेनं किंवा युपीआयद्वारे भरावे लागतात. याशिवाय जेवढा वेळ कार पार्क करणार, तेवढ्या वेळाचे पैसे भरावे लागतात. पण आता हा सगळा खटाटोप करण्याची गरज भासणार नाही. कारण कार पार्क केल्यानंतर त्यावरील फास्टॅगमार्फत पेमेंट होणार आहे. 


कुठे असेल ही सुविधा?


सध्या फास्टॅगनं पेमेंट करण्याची ही सुविधा विमानतळावर उपलब्ध असेल. तुम्हाला आता विमानतळाच्या पार्किंगमध्ये पेटीएम फास्टॅग वापरून पार्किंग शुल्क भरता येणार आहे. ही सुविधा भारतातील निवडक विमानतळांच्या पार्किंगमध्ये सुरू करण्यात आली आहे. पाटणा विमानतळावरही ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी, कार मालकांना त्यांची वाहनं विमानतळावर पार्क करण्यासाठी रोख रक्कम भरण्याच्या त्रासातून जावं लागत होतं. त्यानंतर पार्किंगसाठी मोठी लाईन असायची. आता हा सगळा खटाटोप बंद होणार आहे. FASTag वापरून, ग्राहक आता रोख व्यवहारांशिवाय पार्किंग शुल्क भरू शकणार आहेत. 


का सुरू करण्यात आली ही सुविधा?


ही सुविधा सुरू करण्याची काय गरज होती? असा प्रश्न उपस्थित होत असेल तर? तर थेट उत्तर टोल प्लाझाशी संबंधित आहे. लांब रांगा टाळण्यासाठी टोल प्लाझावर फास्टॅग वापरला जातो. याच कारणामुळे, म्हणजेच विमानतळाच्या पार्किंगच्या ठिकाणी गर्दीची समस्या उद्भवू नये म्हणून FASTag द्वारे पेमेंट करण्याची सुविधाही विमानतळावरच सुरू करण्यात आली आहे. या देयक प्रणालीमागील तंत्रज्ञान FASTag वर अवलंबून आहे, जी एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. FASTag असलेले वाहन एंट्री किंवा एक्झिट पॉईंटवर पोहोचताच, सेन्सर वाहनाला जोडलेले RFID स्टिकर स्कॅन करेल. त्यानंतर, ते युजर्सच्या पेटीएम वॉलेटमधून किंवा त्यांच्या FASTag शी लिंक केलेल्या खात्यातून पार्किंग शुल्क आपोआप वजा करुन घेईल. 


FAStag नेमकं काय आहे? त्याने काय सुविधा मिळते?


फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर आहे. हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा होते.


रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळ वाचतो, इंधनाची बचत होते.