Smartphone Using Guidline For Children : अलीकडेच राजस्थानमधील (Rajasthan) अलवरमध्ये अशी घटना घडली आहे, ज्यातून प्रत्येक पालकाने धडा घ्यायला हवा. राजस्थानमधील एका घटनेत ऑनलाईन गेमिंगच्या (Online Gaming) सवयीमुळे एका 14 वर्षांच्या मुलाचं मानसिक संतुलन इतकं बिघडलं की, त्याला शेवटी हॉस्टेलमध्ये पाठवावं लागलं. स्मार्टफोनने आपली अनेक दैनंदिन कामं अगदी सोपी केली असली तरी त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.


पालकांनी घ्यावी खबरदारी


लहान मुलांना स्मार्टफोन जास्त वापरल्यास होणाऱ्या नुकसानाबद्दल माहिती नसतं, फोनच्या अतिवापराचा धोका समजण्याइतके ते हुशार नसतात. परंतु त्यांचे पालक सुज्ञ असतात, त्यामुळे आपल्या मुलाला फोनपासून अधिकाधिक लांब ठेवणं पालकांना जमलं पाहिजे. मुलाने जास्त वेळ फोन वापरल्यानंतर त्याचा मुलावर वाईट परिणाम होऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी मुलांनी स्मार्टफोन किती वेळ वापरावा? हे जाणून घेऊया.


ऑनलाईन क्लासमुळे वाढला मोबाईल फोनचा वापर


गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन क्लासमुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. आज घराघरांत स्मार्टफोन आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर, कोरोना काळात शिक्षणाचा काही पर्याय नसल्याने ऑनलाईन क्लास सुरु झाले आणि तेव्हापासून मुलं अतिप्रमाणात मोबाईल फोन वापरु लागले. मुलं घरी बसून अनेक तास मोबाईल स्क्रीन पाहून अभ्यास करु लागले आणि त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम वाढला. स्मार्टफोन हे मनोरंजनाचंही उत्तम साधन आहे आणि त्यामुळेच मुलं अभ्यासासोबतच ऑनलाईन गेमिंगच्या कचाट्यातही सापडले. आता कोरोनाचा धोका टळला असला तरी अभ्यासासाठी फोन घेतोय, हे मुलांचं कारण काही संपत नाही. त्यामुळे मोबाईल फोन वापरण्यासाठी ठराविक वेळ नेमून दिला पाहिजे.


मुलांनी किती वेळ मोबाईल वापरावा?


सोप्या भाषेत सांगायचं तर, 24 तासांपैकी लहान मुलं किती तास टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल फोन वापरतात, याला स्क्रीन टाईम म्हणतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (World Health Organization) स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या मुलांशी संबंधित धोके ओळखण्यास सुरुवात केली आहे.


वॉशिंग्टन पोस्टने (Washington Post) डब्ल्यूएचओच्या (WHO) अहवालावर आधारित एक लेख प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये दोन ते चार वर्षांच्या मुलांनी दिवसातून एक तास फोन वापरणं योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर, चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी दररोज दोन तास फोन वापरणं योग्य आहे, असं सांगण्यात आलं आहे. यापेक्षा जास्त स्क्रीन समोर राहिल्याने डोळ्यांसोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.


स्क्रीन टाईमबाबत काही मार्गदर्शक तत्त्वं


अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने (American Academy of Pediatrics) मुलांच्या स्क्रीन टाईमबाबत काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत, त्यानुसार



  • दीड वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी स्क्रीन वापरु नये.

  • दीड ते दोन वर्षांच्या मुलांना स्क्रीनवर फक्त त्यांच्या पात्रतेचे कार्टून, गाणी दाखवा.

  • दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना एक तासापेक्षा जास्त स्क्रीन वापरु देऊ नका.

  • सहा वर्षे आणि त्यावरील मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित असावा. त्यांच्याकडे झोप, शारीरिक हालचाली आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी पुरेसा वेळ असावा.


सरकारचा पुढाकार


मात्र, सध्या परिस्थिती वेगळी आहे. शालेय वर्गांव्यतिरिक्त, मुलं असाईन्मेंट, संशोधन आणि मनोरंजनासाठी मोबाईल आणि लॅपटॉप वापरत आहेत आणि त्यामुळे त्याचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, डिजिटल शिक्षणाचे मुलांवर होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम लक्षात घेऊन मानव विकास संसाधन मंत्रालयाने 'प्रगत' नावाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात ऑनलाईन वर्गांची संख्या आणि वेळ मर्यादित करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.



  • पूर्व-प्राथमिक (टॉडलर्स) : पालकांना संवाद साधण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी 30 मिनिटांची सत्रं

  • पहिली ते आठवी इयत्ता : दररोज 30 ते 45 मिनिटांचे दोन वर्ग.

  • इयत्ता नववी ते बारावी : दररोज 30 ते 45 मिनिटांचे चार वर्ग.


हेही वाचा:


India: आंबा खाऊन महिलेचा मृत्यू! अशा कोणत्या केमिकलमध्ये पिकवले जातात आंबे? जाणून घ्या