Twitter Logo: ट्विटरचे (Twitter) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) हे त्यांच्या आश्चर्यकारक निर्णयांसाठी ओळखले जातात. ट्विटरची मालकी घेतल्यापासूनच मस्क त्यांच्या झटपट आणि भन्नाट निर्णयांमुळे कायमच चर्चेत असतात. अशातच आता नव्या निर्णयामुळे एलॉन मस्क चर्चेत आहेत. आज पहाटे जर तुम्ही ट्विटर ओपन केलं असेल तर तुम्हाला ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला असेल. यावेळी एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) हटवलाय. पहाटेपासून ट्विटर सुरू करणाऱ्या अनेक युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Doge चा फोटो दिसत होता. जरी हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.
Twitter होम बटणावर झालाय बदल
मात्र, हा बदल सध्या ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि युजर्सना सध्या ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे. ट्विटरचं होम बटण म्हणून दिसणार्या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डोगेचं चित्र दिसत आहे आणि हा बदल काही तासांपूर्वीच झाला आहे.
एलॉन मस्क यांचे मजेशीर ट्वीट
ट्विटरचा आयकॉनिक लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्क यांनी एक मजेशीर पोस्टही शेअर केली. त्यांनी आपल्या अकाउंटवर डॉगे मीम शेअर करत एक मजेशीर ट्वीटही शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात धरलं आहे. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, "ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे."
Doge Image नक्की आहे तरी काय?
आयकॉनिक ब्लू-बर्डला हटवून एलॉन मस्क यांनी ठेवलेली Doge Image नेमकी काय आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. डॉज (Doge) इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सीचं प्रतीक आणि लोगो आहे. 2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक विनोद म्हणून Doge Image लॉन्च करण्यात आलं होतं.
एलॉन मस्कनं शेअर केला जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉट
एलॉन मस्कनं त्यांच्या अकाऊंटवर एका जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एका अज्ञात अकाउंटशी चर्चा करत आहेत. यामध्ये ती व्यक्ती मस्क यांना ट्विटरच्या बर्ड लोगोच्या जागी Doge Image लावण्यास सांगत आहे. काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये ही पोस्ट शेअर करताना एलॉन मस्क यांनी लिहिलं आहे की, 'As promised' म्हणजेच, जे वचन दिलं ते मी पूर्ण केलं.