Twitter CEO Update: ट्विटर (Twitter) चे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी सीईओ (CEO) पद सोडण्याची घोषणा केली आहे. ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड करण्यात आली आहे, लवकरच एलॉन मस्क पाऊतार होऊन नवे सीईओ या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचं खुद्द एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. मस्क यांनी अद्याप नव्या सीईओंच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र ट्विटरचा कार्यभार आता एक महिला सीईओ पाहणार असल्याचे एलॉन मस्क यांनी सूचित केलं आहे.
मस्क यांनी ट्वीट केलं की, त्यांनी ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचं जाहीर करताना मला आनंद होत आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अशी असेल, असंही एलॉन मस्क यांनी सांगितलं.
एलॉन मस्क यांना कोणत्याही कंपनीचे सीईओ बनायचं नाही
एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतलं आणि तेव्हापासून ते त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ट्विटरला कायमस्वरूपी सीईओ नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले की, नवे सीईओ आल्यानंतर त्यांची भूमिका बदलेल. आपल्याला कोणत्याही कंपनीचे सीईओ व्हायचं नाही, अशी माहिती मस्क यांनी दिली होती.
मस्क यांनी राजीनामा देण्याचे दिलेले संकेत
मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील आपला वेळ कमी करण्याची आणि कालांतरानं ट्विटरचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी कोणीतरी शोधण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. मी सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. एलॉन मस्कनं ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच, तोट्यात सुरू असलेलं ट्विटर सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि त्यातून आर्थिक नफा मिळवण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल घेतले होते.
मस्क पुन्हा करणार ट्विटरमध्ये बदल
एलॉन मस्क यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस ट्वीट करून यूजर्सना संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, युजर्सना प्रत्येक लेखानुसार शुल्क भरावं लागणार आहे. ते म्हणाले होते की, जर युजर्सनी मंथली सबस्क्रिप्शनसाठी साईन अप केलं नाही तर त्यांना लेख वाचण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.
याआधी मस्क यांनी व्हेरिफाईड अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली होती. मस्क यांनी म्हटलं होतं की, जे युजर्स ब्लू टिकसाठी पैसे देत नाहीत, त्यांना ब्लू टिक मिळणार नाही. एलॉन मस्क यांनी 12 एप्रिलला ब्लू टिकबद्दल ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, 20 एप्रिलपासून व्हेरिफाईड अकाउंटमधून लीगेसी ब्लू टिक मार्क हटवला जाईल. मस्क यांनी आधीच जाहीर केलं होतं की, जर ब्लू टिक हवी असेल तर त्यासाठी मासिक शुल्क भरावं लागेल.