Cvigil APP : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने Cvigil ॲप अपडेट केलं आहे. या ॲपच्या मदतीने आचारसंहिता भंगाची तक्रार काही मिनिटांत करता येते आणि त्यावर केलेल्या कारवाईची माहिती 100 मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचते. लोकसभा निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसल्यास, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून त्याबाबत सहज तक्रारदेखील करू शकता.
आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Android फोनमध्ये Cvigil ॲप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही आचारसंहिता उल्लंघनाबाबत फोटो किंवा व्हिडीओद्वारे ऑनलाईन तक्रार करू शकता. या ॲपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते आणि आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाते. तुम्हालाही Cvigil ॲप कसं वापरायचं हे जाणून घ्यायचं असेल, तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Cvigil ॲपद्वारे आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करा
आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी Cvigil ॲप तयार करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत आचारसंहिते संदर्भातील तक्रारीवर योग्य पुराव्याअभावी कोणतीही कारवाई करता येत नव्हती. पण, Cvigil ॲपच्या मदतीने आता कोणतीही व्यक्ती आचारसंहिता भंगाची तक्रार काही मिनिटांत पुराव्यासह करू शकणार आहे. तसेच या ॲपद्वारे तक्रार केल्यास 100 मिनिटांत त्यावर कारवाई केली जाईल.
अँड्रॉईड मोबाईलमध्ये Cvigil ॲप वापरण्यात येणार
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार अँड्रॉईड मोबाईलवर Cvigil ॲप वापरता येणार आहे. पोटनिवडणूक, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आलं आहे. या ॲपचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तक्रार करताना, हे ॲप ऑटो मोडमध्ये लोकेशन निवडते, ज्यामुळे तक्रारकर्त्याला आचारसंहिता भंगाच्या ठिकाणाविषयी तपशील देण्याची आवश्यकता भासत नाही.
Cvigil ॲप कसे कार्य करते?
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पण, त्यांच्यावर कारवाई करण्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या बहुतांश घटनांमध्ये वेळेवर कारवाई होऊ शकली नाही. पण, Cvigil ॲपच्या मदतीने तुम्ही तक्रार करताना आचारसंहिता भंगाचा फोटो किंवा 2 मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करू शकता. ज्याच्या आधारावर निवडणूक आयोग तक्रार केल्यानंतर 100 मिनिटांत कारवाई करतो.
जर तुम्हाला Cvigil ॲपद्वारे आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करायची असेल, तर फोटो किंवा 2 मिनिटांचा व्हिडीओ तयार करा आणि त्याचे संक्षिप्त वर्णन तयार करा. यानंतर, Cvigil ॲप ओपन करा आणि व्हिडीओ किंवा फोटोसह कॅप्शन लिहा. या दरम्यान, लोकेशन मॅपिंग ऑटो मोडमध्ये केले जाईल. तुम्ही सबमिशन टॅप दाबून तक्रार पोस्ट करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :