नवी दिल्ली : चॅटजीपीटी (ChatGPT) हा एआय चॅटबॉट (AI Chatbot) लसीबाबतचे गैरसमज दूर करून लसीकरणासाठी (Vaccination) अधिक चालना देऊ शकतो, असं एका अभ्यासात उघड झालं आहे. कोरोनाकाळात लसीकरण हा महत्त्वाचा उपाय आणि मुद्दाही बनला होता. या काळात लसीच्या वापराबाबत अनेक अफवा आणि खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांनं संभ्रम आणि भीतीचं वातावरणही पसरलं होतं. त्यामुळे प्रत्येक जण इंटरनेटवर लस आणि त्यांच्यांबाबतची अधिक माहिती शोधण्यात गुंतलेला होता.


चॅटजीपीटी गैरसमज दूर करून लसीकरणासाठी अधिक चालना देऊ शकतो


चॅटजीपीटी या चॅटबॉटबाबत लसीकरणाबाबत एक अभ्यास करण्यात आला. ह्युमन व्हॅक्सिन्स अँड इम्युनोथेरप्युटिक्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, संशोधकांनी सर्वसामान्यांकडून सर्वाधिक विचारले जाणारे कोविड-19 लसीसंदर्भातील टॉप 50 प्रश्न चॅटजीपीटीला विचारण्यात आले. या प्रश्नांमध्ये अफवा आणि व्हायरल बाबींचाही समावेश होता. 


चॅटजीपीटीने अचूक माहिती देण्यास सक्षम


या अभ्यासात संशोधकांना असं आढळून आलं की, चॅटजीपीटीने अचूक माहिती सांगितली. संशोधनात याला सरासरी 10 पैकी नऊ गुण देण्यात आले. कोविड लसीबाबत विचारलेल्या प्रश्नांनी चॅटजीपीटीने अचूक उत्तर दिलं. उत्तरामध्ये वैज्ञानिक माहिती सोबतच सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत चॅटजीपीटीने या प्रश्नांची उत्तर दिली, ज्यामुळे लस आणि त्याबाबतचे संभ्रम दूर करण्यात चॅटजीपीटी फार महत्त्वाचा ठरू शकतो, असं संशोधनात उघड झालं आहे.


चॅटजीपीटी लसीकरणाबाबतचे संभ्रम दूर करतो


याचं कारण म्हणजे इतर सर्च इंजिनवर आपण लसी किंवा इतर कोणत्याही विषयासंदर्भात माहिती किंवा प्रश्न विचारला असता, त्यावर मिळणारं उत्तर बहुतेकदा हे फक्त सर्च किंवा व्हायरल माहितीवर अवलंबून असतं. पण, चॅटजीपीटी मात्र, अशा प्रश्नांची उत्तर देताना व्हायरल किंवा चर्चेतील माहिती नाही, तर फक्त तथ्य सांगत खरी आणि अचूक माहिती देतो, त्यामुळे चॅटजीपीटी लसीकरणाबाबतचे संभ्रम दूर करून लसीकरणाला अधिक चालना देऊ शकतं, असं या अभ्यासात म्हटलं गेलं आहे.


वैज्ञानिक पुराव्यांनुसार सविस्तर माहिती सोप्या शब्दात मांडतो


कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना ChatGPT उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांनुसार सविस्तर माहिती तयार करते. चॅटजीपीटी तांत्रिक भाषा न वापरता AI आधारे सोप्या शब्दात मांडते. यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेल्या अफवा दूर करण्यास मदत होते, असं या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि सॅंटियागो डी कंपोस्टेला विद्यापीठातील प्राध्यापक अँटोनियो सलास यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, याच कारणामुळे, चॅटजीपीटी संभाव्यपणे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यात मदत करु शकते.