Google CEO Sundar Pichai : सर्च इंजिन गुगलमध्ये (Google) लवकरच मोठा बदल होणार आहे. गुगल सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सामावून घेतलं जाणार आहे. गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई यांनी याबाबत वक्तव्य केलं. आता गुगल सर्च इंजिनमध्ये टाईप केलं तर चॅटजीपीटीसारखे (ChatGpt) उत्तर मिळणार आहे, द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये हे वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे. ChatGpt कडून तगडं आव्हान मिळाल्यानंतर  गुगलने हे पाऊल उचलले आहे, असं म्हटलं जातं. 


एआयमुळे(AI) गुगलच्या सर्च इंजिन क्षमतेत वाढ  


आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील (AI) सुधारणेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या शोधांना प्रतिसाद देण्याच्या गुगलच्या (Google) क्षमतेमध्ये वाढ  होणार आहे, असे सुंदर पिचाई यांनी सांगितले. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे की, भविष्यात गुगल सर्चमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सपोर्ट केला जाईल, त्यानंतर शोध आणि निकाल अधिक चांगले आणि अचूक असतील. 


कंपनीने वेळीच धोका ओळखला


गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्चचा वापर केला जात आहे. यूएसमधील या टेक फर्मचा मुख्य व्यवसाय 'सर्च इंजिन' आहे आणि मूळ कंपनी अल्फाबेटच्या कमाईचा निम्मा वाटा याचा आहे. दोन दशकांपासून सर्च इंजिन जगतात अधिराज्य गाजवणाऱ्या कंपनीपुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित चॅटबॉट्स गुगलच्या सर्च इंजिन व्यवसायाला अडचणीत आणू शकतात. मात्र कंपनीने वेळीच हा धोका ओळखला. त्याताच भाग म्हणून सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या गुगल सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट समाविष्ट करण्याची योजना आखत आहेत. अलीकडेच कंपनीने Bard AI चॅटबॉट सादर केला होता. आता कंपनी ते गुगल सर्च इंजिनमध्ये जोडण्याची तयारी करत आहे.


मायक्रोसॉफ्टला टक्कर


मायक्रोसॉफ्टने यावर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या सर्चच इंजिन Bing मध्ये ChatGPT जोडून रिलॉन्च केलं होतं. यामुळे युझर्सना सर्चसोबतच चॅटबॉटचाही अनुभव मिळत आहे. यानंतर गुगलनेही मायक्रोसॉफ्ट आणि ChatGPT ला टक्कर देण्यासाठी BARD लॉन्च केलं. परंतु गुगलच्या या चॅटबोटला Bing एवढी लोकप्रियता मिळाली नाही. याचं मोठं कारण चॅटबोटची उपलब्धता हेआहे. गुगलने भलेही BARD ची घोषणा केली, पण आतापर्यंत हे फीचर निवडक युझर्सपर्यंतच पोहोचलं आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या New Bing च्या लॉन्चिंगनंतर सर्च इंजिनवर युझर्सची संख्या वेगाने वाढली आहे. अशात गुगलसमोर आपलं वर्चस्व टिकवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. गुगर अनेक वर्षांपासून सर्च इंजिन मार्केटच्या शिखरावर आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या अनेक प्रयत्नांनंतरही गुगला टक्कर देता आलेली नाही. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मायक्रोसॉफ्टला आशेचा किरण दाखवला आहे. मायक्रोसॉफ्टने ChatGPT सोबत आपलं सर्च इंजिन Bing रिलॉन्च केलं, ज्याला युझर्सची पसंती मिळत आहे. गुगनेही ही बाब ओळखली आणि संधी न दवडता आपला AI बॉट BARD सादर केला. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता कंपनी लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये याचा समावेश करणाची शक्यता आहे.