मुंबई: ‘भारतीय क्रिकेटमधील ज्येष्ठ खेळाडू राहुल द्रविड आणि झहीर खान यांचा जाहीरपणे अपमान केला जात आहे.’ असं स्पष्ट मत बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे (सीओए) माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. द्रविड आणि झहीर यांची सल्लागार म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्यानं गुहा यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.


रामचंद्र गुहा यांनी ट्विटरवरुन याबाबत आपलं मत व्यक्त केलं. 'अनिल कुंबळेला दिलेल्या वाईट वर्तणुकीनंतर आता झहीर आणि राहुल द्रविडबाबत ज्या पद्धतीनं निर्णय घेतला जात आहे तो अतिशय बेजबाबदारपणा आहे. कुंबळे, द्रविड आणि झहीर या महान खेळाडूंनी मैदानावर आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यामुळे त्यांचा असा जाहीरपणे अपमान होणं ही चुकीची बाब आहे.'


रवी शास्त्री यांच्या नियुक्तीला सीओएनं मंजुरी दिली आहे. पण आतापर्यंत द्रविड आणि झहीर यांच्या नियुक्तीबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सुरुवातीला दोघंही सल्लागार म्हणून भुमिका बजावतील असं बीसीसीआयनं जाहीर केलं होतं. पण आता रवी शास्त्रींसोबत चर्चा करुन याबाबत 22 जुलैला निर्णय घेऊ असं सीओएनं सांगितलं आहे.



दरम्यान, भारतीय क्रिकेटमधील 'सुपरस्टार संस्कृती' यावर टीका करत रामचंद्र गुहा यांनी प्रशासकीय समितीतील सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.

सर्वोच्च न्यायालयाने 30 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांची बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. परंतु वैयक्तिक कारणांचा दाखला देत रामचंद्र गुहा यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

संबंधित बातम्या:

धोनी, द्रविडवर प्रश्नचिन्ह, रामचंद्र गुहा यांचं राजीनामा पत्र उघड