गोरक्षक, चीन, अमरनाथ मुद्द्यावरुन संसदेचं पावसाळी अधिवेशन गाजणार
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2017 07:51 AM (IST)
गोरक्षक, शेतकरी आंदोलन, काश्मीर तणाव आणि चीनचा हस्तक्षेप या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. गोरक्षक, शेतकरी आंदोलन, काश्मीर तणाव आणि चीनचा हस्तक्षेप या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची सांगता 11 ऑगस्टला करण्यात येणार आहे. आज सभागृह सुरु होताच निधन झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे आणि त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात येईल. देशातील कथित गोरक्षकांशी संबंधित घटना, अमरनाथ दहशतवादी हल्ल्यासह जम्मू काश्मीरमधील परिस्थिती, डोकलाममध्ये चीनची घुसखोरी, दार्जिलिंगमधील अशांतता अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस, डावे, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर सरकारनेही सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करत 16 नवी विधेयकं सादर करण्याचं सांगितलं आहे. या अधिवेशात आम्ही नियमांनुसारच सर्व मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी तयार आहोत. यादरम्यान अनेक महत्त्वाची विधेयकं सादर केली जातील, तर अनेक विधेयक चर्चेनंतर मंजूर केली जातील. आम्हाला विश्वास आहे की, विरोधक सकारात्मक भूमिका निभावेल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं. दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेत 16 नवी विधेयकं सादर केली जातील, ज्यात जम्मू-कश्मीर जीएसटी विधेयक आणि नागरिकता दुरुस्ती विधेयकाचा समावेश आहे.