कटक: टीम इंडियाचा धडकेबाज फलंदाज युवराज सिंहनं आज 150 धावांची खेळी करुन टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. वनडे कारकीर्दीतील ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे.
'कटक वनडेमधील शतक खेळी ही माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे.' असं युवराज सिंह सामन्यानंतर म्हणाला. 150 धावांची धडाकेबाज खेळी करणारा युवराज सामनावीर ठरला.
युवराजनं 127 चेंडूत 21 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 150 धावांची धुवाँधार खेळी साकारली. या खेळीविषयी बोलताना युवी म्हणाला की, 'माझ्या करिअरमधील उत्कृष्ट खेळींपैकी ही एक खेळी आहे. मी 2011 साली विश्वचषकात शतक झळकावलं होतं.'
'धोनीसोबत मी एक भागीदारी करण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करत आलो होतो. त्याचा मला फायदा मिळाला. धोनीची मला चांगली साथ मिळाली. जेव्हा धोनी कर्णधार नसतो तेव्हा तो कोणताही दबाव ने घेता फलंदाजी करतो.' असंही युवराज म्हणाला.