योगराज यांनी म्हटले आहे की, 'रायुडू, मुला, तू घाईत निर्णय घेतलास. निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा ये आणि त्या लोकांना सांग तू कोण आहेस ते'. 'धोनीसारखी माणसं नेहमीसाठी राहत नाहीत, अशी घाण कायम राहत नाही', अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
विश्वचषकासाठी रायुडूचा संघात समावेश करण्यात आलेला नव्हता. तो रिझर्व्ह खेळाडूंमध्ये सहभागी होता. शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाल्यानंतर त्याचा समावेश न करता ऋषभ पंत आणि रिझर्व्ह खेळाडूंमध्ये समावेश नसलेल्या मंयक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले.
यावर योगराज यांनी प्रतिक्रिया देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. याआधीही योगराज यांनी महेंद्रसिंह धोनीवर अनेकदा टीका केली आहे. योगराज यांनी धोनीची तुलना रावणाशी केली होती. तसंच धोनीमुळेच युवराज टीमबाहेर गेला. धोनी युवराजला पसंत करायचा नाही, असे आरोप केले होते.
युवराजच्या निवृत्तीनंतरही योगराज यांनी धोनीवर टीका केली होती. भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंना योग्य पद्धतीने निरोप दिला गेला नाही. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग यांच्यासोबत जे घडलं तेच आता युवराजसोबत घडलंय. व्ही.व्ही.एस.लक्ष्मण सारख्या महान खेळाडूलाही अशाच पद्धतीने निवृत्ती स्विकारावी लागली. यासाठी केवळ एकमेव माणूस जबाबदार आहे, असं नाव न घेता योगराज यांनी धोनीला आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं होतं.
योगराज यांनी सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही असं म्हटलं आहे. गेली 15 वर्ष तो घाणेरडं राजकारण खेळतो आहे. कित्येक खेळाडूंचं आयुष्य त्याने बरबाद केलं आहे. विश्वचषक संपू द्या, या सर्व गोष्टी मी पुढे आणणार आहे. तो आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवेल, असं योगराज यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होतं.