नवी दिल्ली : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहने आपल्या निवृत्तीवर खुलपणाने माहिती दिली. युवराजचा पुढील दोन ते तीन वर्ष निवृत्तीचा कोणताही विचार नाही. 2019 चा विश्वचषक आणि कमीत कमी आणखी तीन आयपीएल खेळण्याची युवराजची इच्छा आहे.


यंदाच्या आयपीएलमध्ये युवराजची होम टीम किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये पुनरागमन झालं आहे. पंजाबने त्याला बेस प्राईस 2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.

''एक ना एक दिवस क्रिकेटला अलविदा करायचाच आहे. मात्र सध्या क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे आणि भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्न चालू आहेत,'' असं युवराज ‘स्पोर्ट्स लाईव्ह’शी बोलताना म्हणाला.

कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगावर मात करत पुन्हा क्रिकेटमध्ये परतलेला युवराज सध्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर आहे. भविष्यात 'युवीकॅन' या संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर पीडितांची मदत करण्याची इच्छा असल्याचं युवराजने सांगितलं.

खेळातून अनाथ मुलांना मदत करायची असल्याचं युवराजने सांगितलं. खेळात ज्यांना खरंच मनापासून काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची सोय करणार असल्याचं तो म्हणाला. दरम्यान, निवृत्तीनंतर समालोचकाच्या भूमिकेत जाणार नसल्याचं त्याने आत्ताच स्पष्ट केलं.

36 वर्षीय युवराज टीम इंडियाच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. 2000 साली क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवराजने भारताकडून 40 कसोटी, 304 वन डे आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही, कसोटीत त्याने 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत.

वन डेमध्ये मात्र युवराजने दमदार कामगिरी केलेली आहे. 304 वन डे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 8701 धावा आहेत. ज्यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-20 मध्ये 1177 धावा त्याने केलेल्या आहेत.