लखनौ : उद्याच्या (14 फेब्रुवारी) 'व्हॅलेंटाईन डे'साठी लखनौ विश्वविद्यापीठाने तुघलकी फतवा जारी केला आहे. 'व्हॅलेंटाईन डे'मुळे बुधवारी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये येण्यास सक्त मनाई केली आहे.


विशेष म्हणजे, विद्यापीठ कॅम्पस परिसरात कोणीही फिरताना दिसल्यास, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याला उद्या विद्यापीठात पाठवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

13 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीमुळे विद्यापीठाला सुट्टी आहे. पण उद्याच्या 'व्हॅलेंटाईन डे'मुळे विद्यापीठात होणारे सर्व एक्स्ट्रा क्लासेस आणि प्रॅक्टिकल रद्द करण्यात आले आहेत.


विद्यापीठाच्या या तुघलकी फतव्याचा विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने आपली संकुचित मनोवृत्ती दाखवल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली आहे.

विद्यापीठाचे प्रॉक्टर विनोद सिंह यांनी 10 फेब्रुवारी रोजीच यासंदर्भातील पत्रक जारी केली होतं. 'व्हॅलेंटाईन डे' हा पाश्चात्य संस्कृतीचं प्रतिक असल्याने, 14 फेब्रुवारी रोजी विशेष व्यवस्था लागू करण्याचे निर्देश दिल्याचे यातून सांगण्यात आलं होतं.