नवी दिल्ली : देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने सरकारने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. कारण, येत्या 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी देशभरातील 250 तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत.


शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करुन मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेकदा या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. त्यामुळेच आता रिझल्ट दाखवण्याच्या उद्देशानं उशिरा का होईना? पण सरकारकडून पावलं टाकण्यास सुरुवात झाल्याचं दिसतं आहे.

त्यासाठी येत्या 19 व 20 फेब्रुवारीला दिल्लीत या विषयावर देशभरातल्या 250 तज्ज्ञांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महामंथन करणार आहेत. दिल्लीतल्या पुसा इन्सिट्यूटमध्ये यावर शेतीशी संबंधित तज्ज्ञांची मतं ऐकून घेणार आहेत, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी एकूण सात टीमची रचना करण्यात आली आहे. यात शेतीच्या उत्पादन ते विक्री या साखळीतल्या विविध विषयांवर फोकस ठेवून या टीम बनवल्या गेल्या आहेत. त्यातल्या एका टीमचं नेतृत्व पाशा पटेल करत असून, ते स्वत: पंतप्रधानांसमोर प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. यावर कुणाच्या सूचना असल्यास त्या pashapatelforfarmer@gmail.com या मेल आयडीवर पाठवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातली ही महापरिषद बोलवायला इतका उशीर का झाला? यावर याची घोषणा झाल्यापासूनच, विविध स्तरांवर काम सुरु आहे. आता त्याला आणखी मूर्त स्वरुप देण्यासाठी ही परिषद असल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं.