मुंबई: अष्टपैलू क्रिकेटर युसूफ पठाणला बीसीसीआयने दणका दिला आहे. बीसीसीआयने युसूफ पठाणला हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाकारली आहे.
बीसीसीआयने पठाणला नाहरकत प्रमाणपत्र देण्यास मनाई केली आहे. यापूर्वी बीसीसीआयने हे प्रमाणपत्र दिल्याचा दावा युसूफने केला होता.
मात्र असं प्रमाणपत्र दिलंच नसल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
युसूफ हा ब्रँड अम्बेसेडर म्हणून हाँगकाँग लीगमध्ये खेळणार होता, मात्र ती टी 20 लीग असल्यामुळे त्याला नाहरकत प्रमाणपत्र दिलं नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
या लीगमध्ये युसूफ पठाण कोवलून कॅन्टॉन्सचं प्रतिनिधित्व करणार होता.
पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि इंग्लंडचा टायमल मिल्स यांच्यानंतर युसूफ पठाण हा कोवलून कॅन्टॉन्सचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या दुसऱ्या सत्राला 8 मार्चला सुरुवात होणार आहे. 12 मार्चपर्यंत ही स्पर्धा रंगेल.
या स्पर्धेत 4 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या चार दिवसात साखळी सामने होतील, त्यानंतर 12 मार्चला फायनल होईल.