इंदापूर : निवडणुकी दरम्यान वेगवेगळे फंडे वापरुन प्रचार केला जातो. इंदापुरातही असाच अनोखा प्रकार प्रचारासाठी राबवण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात चक्क घोड्यावरुन निवडणुकीचा प्रचार केला.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत हर्षवर्धन पाटलांनी घोड्यावर स्वार होऊन जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार केला. घोड्यावर स्वार झालेल्या पाटलांसोबत त्यांच्या समर्थकांनी गल्लोगल्ली जाऊन प्रचार केला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4278 उमेदवार रिंगणात आहेत, तर 165 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी 7693 उमेदवार जण नशिब आजमावतील.
दुसऱ्या टप्प्यात दहा महापालिकांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली या जिल्हा परिषदांचा समावेश असून त्यासाठी 21 तारखेला मतदान होणार आहे. सर्व निवडणुकांचा निकाल 23 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.