मुंबई: युसूफ पठाण हा परदेशी लीगमध्ये खेळणारा भारताचा पहिला क्रिकेटर ठरणार आहे.

बीसीसीआयनं त्याला हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. या लीगच्या सामन्यांना आठ मार्चपासून सुरुवात होत आहे.

या लीगमध्ये युसूफ पठाण कोवलून कॅन्टॉन्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला हाँगकाँग लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानं भारतीय क्रिकेटची परिमाणं बदलणार आहेत.

पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि इंग्लंडचा टायमल मिल्स यांच्यानंतर युसूफ पठाण हा कोवलून कॅन्टॉन्सचा सर्वात महागडा खेळाडू आहे.

हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या दुसऱ्या सत्राला 8 मार्चला सुरुवात होणार आहे. 12 मार्चपर्यंत ही स्पर्धा रंगेल.

या स्पर्धेत 4 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या चार दिवसात साखळी सामने होतील, त्यानंतर 12 मार्चला फायनल होईल.

दरम्यान, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या महिला खेळाडूंनाही ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयनं आधीच मंजुरी दिली आहे.