बीड : राज्यात सध्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्याने दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तुफान टीका करत आहेत. बीडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे रामदास कदम यांची प्रचार सभा झाली.
पंकजा मुंडे जमिनीवर कधीच नसतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लोकांमध्ये असायचे, असे म्हणत रामदास कदम यांनी पंकजा यांच्यावर हल्लाबोल केला.
“पंकजा मुंडे म्हणतात, मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री. या मंत्र्यांचे फोन घेत नाहीत, जनतेचे कधी घेणार?”, असा टोलाही रामदास कदम यांनी पंकजा मुंडेंना बीडमधील सभेत लगावला. शिवाय, 'पकंजा ताई, मी पण आहे भाई', असेही रामदास कदम म्हणाले.
“विश्वासघात खातं भाजपकडे”
विश्वासघात हे खातं भाजपकडे आहे. शिवसेना विश्वासघात करत नाही, असे सांगताना रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. “मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला भाषणात फेस आला, हे काम शिवसेनेने केले. फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, गुंडांची भाषा बोलू नका.”, असे रामदास कदम म्हणाले.