जमैका : ख्रिस गेलनंतर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये गोलंदाजांच्या मनात दहशत बसवणारा आणखी एक खेळाडू वेस्ट इंडिजच्या संघात आहे. भारताविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी करुन एव्हिन लेविस या युवा खेळाडूने विजयात मोलाची भूमिका निभावली.


लेविसच्या या तुफान फटकेबाजीकडे नॉन स्ट्राईकला असलेला स्फोटक फलंदाज ख्रिस गेलही पाहत राहिला.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताने दिलेलं 191 धावांचं आव्हान सहज पार केलं. विंडिजने भारतावर 9 विकेट्स राखून विजय मिळवला.

भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लेविसने भारतीय फलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने 62 चेंडूंमध्ये नाबाद 125 धावा केल्या. लेविसने या 125 धावांमध्ये 12 षटकार आणि 6 चौकारही ठोकले.

यासोबतच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधित शतक ठोकण्याचा विक्रमही लेविसने आपल्या नावावर केला आहे. त्याने भारतासोबत दुसरं ट्वेंटी ट्वेंटी शतक ठोकलं. यापूर्वी ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नावावर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये दोन शतकं आहेत.

दोन शतकं ठोकले असले तरी एकाच देशाविरुद्ध दोन ट्वेंटी-ट्वेंटी शतकं ठोकणारा लेविस पहिलाच फलंदाज ठरला आहे. ल्युईसने गेल्या वर्षीही अमेरिकेत झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये भारताविरुद्ध शतक ठोकलं होतं.