कोलंबो : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध कारकीर्दीतला तीनशेवा वन डे सामना खेळला. तीनशेव्या वन डेच्या निमित्ताने टीम इंडियाच्या वतीने धोनीला खास चांदीची बॅट गिफ्ट म्हणून देण्यात आली.

यावेळी बोलताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली भावूक झाला. "धोनीबद्दल काय बोलायचं. आमच्यापैकी 90 टक्के खेळाडूंनी त्यांच्या करिअरची सुरुवात धोनीच्याच नेत्तृत्वात केली आहे. त्याचा हा सन्मान करणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तो नेहमी आमचा कर्णधार राहिल, असं विराट म्हणाला.

कोलंबो वन डेत धोनीना नाबाद खेळी केली. मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनीने सहाव्या विकेटसाठी 101 धावांची अभेद्य भागीदारी रचली. पांडे 50, तर धोनी 49 धावांवर नाबाद राहिला.

धोनीचं सामन्यांचं त्रिशतक

श्रीलंकेविरुद्धचा कोलंबो वन डे धोनीचा तीनशेवा वन डे होता. भारताच्या वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सामन्यांचं त्रिशतक साजरं करणारा धोनी हा सहावा शिलेदार ठरला. याआधी सचिन तेंडुलकरने 463, राहुल द्रविडने 344, मोहम्मद अझरुद्दिनने 334, सौरव गांगुलीने 311 आणि युवराज सिंहने 304 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्या रथीमहारथींच्या ‘क्लब थ्री हण्ड्रेड’मध्ये आता धोनीची एण्ट्री झाली.