2017 या कॅलेंडर वर्षात भारतीय क्रीडा क्षेत्रात अनेक घडामोडी पहायला मिळाल्या. अनेक खेळांडूंनी वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले. क्रिकेटसोबतच बॅडमिंटन, हॉकी यांसारख्या खेळातही भारताची कामगिरी उल्लेखनिय ठरली. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडा विश्वातल्या वर्षभरातल्या घडामोडींचा घेतलेला हा आढावा...


क्रिकेट- यंदाचं वर्ष क्रिकेटच्या दृष्टीनं ‘विजयी वर्ष’ ठरलं. या कॅलेंडर वर्षात टीम इंडियानं 53 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 37 सामन्यांत विजय मिळवला तर फक्त 12 सामने गमावले. 2017 साली खेळलेल्या सर्व वन डे आणि कसोटी मालिकांमध्ये टीम इंडिया अपराजित राहीली. या वर्षात इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या दोन वन डे मालिका अशा एकूण सहा वन डे आणि बांगलादेश, ऑस्ट्रेलिया,  श्रीलंकेविरुद्धच्या एकूण चार कसोटी मालिका टीम इंडियानं आपल्या खिशात घातल्या. ट्वेंटी ट्वेंटीतही वेस्ट इंडिज मालिकेचा अपवाद वगळता सहा पैकी चार मालिकांवर टीम इंडियानं आपलं वर्चस्व गाजवलं.

भारतानं यंदाच्या वर्षात सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशीही बरोबरी केली. तर वन डेतही सलग आठ द्विपक्षीय मालिका जिंकल्या.

जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या चँपियन्स ट्रॉफीत टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला 180 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी तर हे वर्ष विक्रमांचं वर्ष ठरलं. विराटनं या वर्षात 46 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2818 धावांचा रतीब घातला. त्यात 11 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश होता. विराटनं वन डेत 32 शतकं ठोकताना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिननंतर दुसऱं स्थान गाठलं. त्यानं आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत शतकांचं अर्धशतकही पूर्ण केलं. विराटनं यंदाच्या वर्षी कसोटीत पाच हजार आणि वन डेत नऊ हजार धावांचा टप्पा गाठला. कसोटीत यंदाच्या वर्षी विराटनं तब्बल तीन द्विशतकं ठोकली आणि कारकीर्दीत एकूण सहा द्विशतकं झळकावणारा तो एकमेव कर्णधार ठरला.

विराटच्या मैदानावरील कामगिरीव्यतिरिक्त मैदानाबाहेर विराट गाजला ते त्याच्या लग्नामुळे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा लग्नसोहळा इटलीत पार पडला. त्याशिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि झहीर खाननंदेखील यावर्षी आपल्या लग्नगाठी बांधल्या.

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली वन डेत कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक ठोकलं. असा पराक्रम करणारा तो जगातला एकमेव फलंदाज ठरला. या सामन्यात त्यानं नाबाद 208 धावांची खेळी उभारली.  त्यानंतर रोहितनं ट्वेन्टी ट्वेन्टीतही 35 चेंडूत शतक ठोकत ट्वेन्टी ट्वेन्टीतल्या वेगवान शतकाशी बरोबरी केली.

यंदाच्या वर्षात भारतीय निवड समितीनं नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संघात प्राधान्य दिलं. याचाच परिणाम म्हणून यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या रुपात टीम इंडियाला मनगटी फिरकी गोलंदाजांची जोडी लाभली. या दोघांनी वन डे आणि टी ट्वेन्टीत मिळून यावर्षी तब्बल 78 विकेट्स आपल्या नावावर केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत इडन गार्डन्सवरच्या सामन्यात चायनामन कुलदीपनं हॅटट्रिकची नोंद केली. चेतन शर्मा, कपिल देवनंतर वन डेत हॅटट्रिक करणारा तो तिसरा भारतीय ठरला.

ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विननं कसोटी कारकीर्दीतील 300 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. कसोटीत 300 विकेट्स घेणारा तो पाचवा गोलंदाज ठरला. त्यानं 54 कसोटीत हा टप्पा पार करत डेनिस लिलीचा जलद 300 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडीत काढला.

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीनं वन डेत 100 स्टंपिंग करण्याचा विक्रम केला. असा पराक्रम करणारा धोनी पहिला विकेट कीपर ठरला.

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं यंदाच्या महिला विश्वचषकात 2005 नंतर दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. पण दुर्दैवानं याही वेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताचं विश्वचषक विजयाचं स्वप्न केवळ 9 धावांनी दूर राहिलं.

दरम्यान कर्णधार मिताली राजनं महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होण्याचा मान मिळवला. तिनं इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. मितालीला यावर्षीच्या आय़सीसी महिला वन डे संघातही स्थान मिळालं. तर आक्रमक महिला फलंदाज हरमनप्रीत कौरचा आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात समावेश करण्यात आला. टीम इंडियाची डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिश्त आयसीसीच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी अशा दोन्ही संघात स्थान मिळवणारी एकमेव खेळाडू ठरली.

भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरानं वयाच्या 38व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नेहरानं दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळून आपल्या 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला विराम दिला.

यंदाच्या जुलै महिन्यात अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रवी शास्त्रीची 2019च्या विश्वचषकापर्यंत भारताचा नवा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आयपीएलच्या दहाव्या मोसमात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं तिसऱ्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. अंतिम सामन्यात मुंबईनं रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर विजय मिळवला.

भारतीय क्रिकेटपटूंच्या मानधनातही बीसीसीआयनं यावर्षी घसघशीत वाढ केली.

बॅडमिंटन-  बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू आणि किदंबी श्रीकांतची कामगिरी यंदा उल्लेखनिय ठरली. सिंधूनं यावर्षी इंडिया ओपन आणि कोरिया ओपन या स्पर्धांमध्ये विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूची जपानच्या नोझोमी ओकुहोराशी झालेली लढत विशेष लक्षवेधी ठरली. तब्बल 110 मिनिटं चाललेल्या  या सामन्यात ओकुहोराची सरशी झाली मात्र सिंधूनं सर्वांची मनं जिंकली.  जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील रौप्य पदकासह सिंधूनं हाँगकाँग ओपन आणि दुबई सुपर सीरिजमध्ये उपविजेतेपद पटकावलं.

पुरुष एकेरीत यावर्षी किदंबी श्रीकांतनं चार सुपर सीरिज विजेतेपदं आपल्या नावावर केली. यात फ्रेंच ओपन, डेन्मार्क ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि इंडोनेशिया ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. याशिवाय सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत भारताच्याच बी. साईप्रणितनं विजेतेपद मिळवलं.

भारताची फुलराणी सायना नेहवालनं मात्र यावर्षी एकमेव सुपर सीरिज स्पर्धा जिंकताना मलेशियन ओपनमध्ये विजेतेपद पटकावलं. तर राष्ट्रीय वरिष्ठ विजेतेपद स्पर्धेत तिनं सिंधूला नमवत सुवर्णपदक जिंकलं.

फुटबॉल-  भारतात यावर्षी पहिल्यांदाच फिफाच्या 17 वर्षांखालील विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं. भारताचा 17 वर्षाखालील फुटबॉल संघ हा फिफाच्या कुठच्याही स्पर्धेत सहभागी होणारा पहिला संघ ठरला.  फिफाच्या या विश्वचषकात प्रेक्षकांचाही विक्रमी प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत 12 लाख 30 हजार 976 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी मैदानात उपस्थिती लावली. हाही एक विश्वविक्रम ठरला.

याशिवाय यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच भारतीय फुटबॉल संघानं जागतिक क्रमवारीतही 96 व्या स्थानावर झेप घेतली होती.

 

हॉकी-  मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघानं बांगलादेशमध्ये झालेली आशिया चषक स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली. या विजेतेपदासह भारत 2018 सालच्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरला.

महिलांच्या हॉकी संघानं देखील 13 वर्षांनंतर आशिया चषकाचा मान मिळवला. ऑक्टोवर महिन्यात जपानमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय महिलांनी अंतिम सामन्यात चीनवर पेनल्टी शूटआआऊटमध्ये विजय मिळवला.    

 

वेटलिफ्टींग- वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या सैखोई मिराबाई चानूनं ऐतिहासिक कामगिरी केली. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये झालेल्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत चानूनं 48 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. 22 वर्षानंतर जागतिक स्पर्धेत करनाम मल्लेश्वरीनंतर सुवर्ण पदक मिळवणारी चानू दुसरी भारतीय महिला ठरली. याआधी 1995 साली मल्लेश्वरीनं जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं होतं.

 

टेनिस-  रोहन बोपण्णानं फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवत ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा चौथा भारतीय होण्याचा मान मिळवला. बोपण्णानं कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोवस्कीच्या साथीनं फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलं. सानिया मिर्झानं ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्रदुहेरीत क्रोएशियाच्या इव्हान डोडीगच्या साथीनं उपविजेतेपद मिळवलं. लिअँडर पेसनं पुरुष दुहेरीत पूरव राजाच्या साथीनं यावर्षी अमेरीकेत झालेली एटीपी चॅलेंजर्स ही एकमेव स्पर्धा जिंकली.

 

स्नूकर, बिलियर्ड-  स्नूकर-बिलियर्ड प्रकारात पंकज अडवाणी हे नाव यंदाच्या वर्षी चर्चेत राहीलं ते त्याच्या 18 जागतिक अजिंक्यपदांसाठी. नोव्हेंबरमध्ये दोहा इथं झालेल्या जागतिक स्नूकर आणि बिलियर्ड स्पर्धेत पंकजनं इंग्लंडच्या माईक रसेलला हरवत 17 वं जागतिक अजिंक्यपद मिळवलं. त्यानंतर 3 बॉल स्नूकरमध्ये ईराणच्या आमिर सरखोशवर मात करत पंकजनं 18व्या विजेतेपदाला गवसणी घातली.

याशिवाय जुलै महिन्यात किरगीस्तानमध्ये झालेल्या आशियाई टीम स्नूकर स्पर्धेत पंकज अडवाणीच्या नेतृत्वाखाली भारत अ संघानं पाकिस्तानला 3-0 ने नमवत सुवर्ण पदकाची कमाई केली.

 

कबड्डी-  नोव्हेंबर महिन्यात इराणमध्ये झालेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं जेतेपद पटकावलं. अजय ठाकूरच्या भारतीय संघानं अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 36-22 अशी मात केली. तर महिला संघानं दक्षिण कोरियाला पराभवाची धूळ चारली.

कुस्ती- ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारनं तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कुस्तीत पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सवर्ग इथं झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुशील कुमारनं सुवर्ण पदक जिंकलं.

शूटींग- भारताच्या हीना सिध्दू आणि जितू रायनं आंतरराष्ट्रीय शूटींग स्पोर्टस फेडरेशच्या विश्वचषक फायनलमध्ये 10 मीटर एअर रायफल पिस्टलच्या मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.

 

बॉक्सिंग-  बॉक्सर गौरव बिदुरीनं जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. ही स्पर्धा जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये 25 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत पार पडली.

बुद्धिबळ : भारताच्या विश्वनाथन आनंदनं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रियाधमध्ये आयोजित  रॅपिड बुद्धिबळाच्या जागतिक विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. याआधी आनंदनं 2003 साली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जागतिक विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तब्बल चौदा वर्षांनी आनंद पुन्हा एकदा रॅपिड बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरला.