मुंबई : भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाने नुकतंच श्रीलंकेला 144 धावांनी पराभूत करुन विक्रमी सहा वेळा आशिया चषक आपल्या नावावर केला. या मालिकेदरम्यान अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आणि यशस्वी जैसवाल हा त्यापैकीच एक. संघाचा सलामीवीर यशस्वीने अंतिम सामन्यात 85 धावांची खेळी रचली होती. शिवाय या स्पर्धेतील सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर जमा झाल्या आहेत. त्याने तीन सामन्यात 214 धावा केल्या आहेत.
यशस्वीच्या खेळाचं जेवढं कौतुक होत आहे, तेवढंच कौतुक त्याच्या संघर्षाचं होत आहे. अंडर-19 संघात स्थान मिळवण्यासाठी यशस्वीने अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. कठोर परिश्रम आणि संघर्षाचा परिणाम म्हणून आज सगळे त्याच्या खेळाचं कौतुक करत आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वेबसाईटवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून यशस्वीचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
यशस्वीला कोच ज्वाला सिंह यांची साथ
प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी यशस्वी जैसवालला खेळताना पाहिलं, तेव्हा तो केवळ 11 किंवा 12 वर्षांचा होता, त्यावेळी यशस्वी अनेक अडचणींसाचा सामना करत होता. तो उत्तम खेळायचा पण त्याच्याकडे प्रशिक्षक नव्हता. शिवाय आई-वडीलही सोबत राहायचे नाहीत. ज्वाला सिंह यांनी सांगितलं की, "यशस्वीला मोठी धावसंख्या करण्याची सवय आहे. तसंच या युवा प्रतिभावान खेळाडूकडे क्रिकेटविषयी प्रेम आहे."
पाणीपुरी विकून स्वप्न पूर्ण केलं
केवळ 11 वर्षांचा असताना यशस्वीने उत्तर प्रदेशमधील भदोही या छोट्या जिल्ह्यातून मुंबईपर्यंतचा प्रवास केला होता. त्याच्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. आपल्या आयुष्याबद्दल बोलताना यशस्वीने सांगितलं की, "मला फक्त क्रिकेट खेळायचं आहे आणि तेही मुंबईतूनच, हा विचार करुनच मी इथे आलो. जेव्हा एका तंबूत राहता तेव्हा तुमच्याकडे वीज, पाणी, बाथरुम यांसारख्या आवश्यक सोयीही नसतात."
कठीण परिस्थितीत यशस्वी आपला खर्च भागवण्यासठी मुंबईच्या आझाद मैदानावर काकासोबत पाणीपुरीही विकायचा. मला पाणीपुरी विकायला आवडत नसे. कारण ज्या मुलांसोबत मी क्रिकेट खेळायचो, जे सकाळी माझं कौतुक करायचे, तेच संध्याकाळी माझ्याकडे पाणीपुरी खाण्यासाठी यायचे. पण गरज असल्याने मला हे करणं आवश्यक होतं, असं म्हणाला.
सचिनही यशस्वीचा चाहता
ही फक्त सुरुवात आणि तुला आणखी खेळायचं आहे, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटल्याचं यशस्वीने सांगितलं. सचिन तेंडुलकर हा पण यशस्वीच्या खेळाचा चाहता आहे. एकदा सचिनने यशस्वीला घरी बोलावलं, त्याला खेळाच्या टिप्स दिल्यानंतर त्याच्या स्वाक्षरीची बॅटही भेट म्हणून दिली होती.
वेंगसरकरांनी यशस्वीला इंग्लंडला नेलं
भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यशस्वीला अंडर-14 क्रिकेटमध्ये खेळवण्यासाठी इंग्लंडला घेऊन गेले. इथे यशस्वीने दुहेरी शतक ठोकलं आणि 10 हजार पौंडचं बक्षीस जिंकलं.
यशस्वीचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
अंडर-14 क्रिकेटच्या एका सामन्यात अष्टपैलू कामगिरी करताना त्याने नाबाद 319 धावा केल्या आणि 13 विकेट्सही मिळवल्यानंतर यशस्वीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. जाईल्स शील्डमध्ये राजा शिवाजी विद्यामंदिरविरोधात उल्लेखनीय कामगिरीनंतर त्याची मुंबईच्या अंडर-19 संघात आणि मग भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली. आगामी दिवसात सीनियर भारतीय संघाचा तो दावेदार आहे.
पाहा व्हिडीओ
पाणीपुरी विकून टीम इंडियात एन्ट्री, यशस्वीचा संघर्षमय प्रवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2018 11:01 AM (IST)
यशस्वीच्या खेळाचं जेवढं कौतुक होत आहे, तेवढंच कौतुक त्याच्या संघर्षाचं होत आहे. अंडर-19 संघात स्थान मिळवण्यासाठी यशस्वीने अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -