ठाणे : ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळचा नाश्ता बनवला नाही म्हणून चक्क भाचीनेच विकलांग मावशीच्या डोक्यावर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. यात हल्ल्यात मावशीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोपट परिसरातील विनायक भवन सोसायटीत शनिवारी पहाटे साडेसात वाजता ही घटना घडली. शोभा कुलकर्णी असे या मृत मावशींचे नाव असून त्या 75 वर्षांच्या होत्या. तर 45 वर्षीय आरोपी स्वप्ना कुलकर्णीस राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने स्वप्ना कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

खोपट परिसारत विनायक भवन सोसायटीत शोभा गणेश कुलकर्णी (७५) आणि त्यांची भाची स्वप्ना सुधीर कुलकर्णी (४५) ह्या दोघी आपल्या परिवारासोबत एकत्र राहात असत. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शोभा यांनी स्वप्नाला नाश्ता बनवण्यास नकार दिला. या गोष्टीचा स्वप्नाला राग आला आणि तिने मावशीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. स्वप्ना एवढच करुन थांबली नाही तर मावशीच्या डोक्यावर धारधार चाकूने सपासप वार करत तीची हत्या केली.

हत्ये प्रकरणी राबोडी पोलिसांनी स्वप्नाला अटक केली असून तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने स्वप्नाला न्यायालयीन कोठडी दिली आहे.